नवी दिल्ली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहांनी केलेल्या अपमानाजनक वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. याविरोधात संसद परिसरात आज राहुल गांधी निळा टी-शर्ट आणि प्रियंका गांधी निळ्या साडीत आल्या. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र हातात घेऊन संसद परिसरात विरोधकांनी आंदोलन केले. त्यानंतर संसदेत जात असताना राहुल गांधी आणि भाजप खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाची तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसनेही दिल्ली पोलिसात तक्रार दिली आहे.
राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करत भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधींविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन राहुल गांधी यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार सहा कलमे लावण्यात आली आहे.
राहुल गांधींविरोधात लावली ही कलमे
राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार सहा कलमे लावण्यात आली आहे.
कलम 109 (हत्येचा प्रयत्न)
कलम 115 (जखमी करणे),
कलम 117 (गंभीर जखमी करणे),
कलम 121 (सरकरारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलीत करण्यासाठी जखमी करणे) ,
कलम 351 (अपराधिक धमकी) , 125 (इतरांच्या सुरक्षेला धोक्यात आणणे)
संसदेत गुरुवारी सकाळी इंडिया आघाडी आणि भाजप खासदारांचे आंदोलन सुरु होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्याच्या निषेधार्थ आणि शहांच्या राजीनामा मागणीसाठी काँग्रेससह इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु होते. याच दरम्यान दोन्ही बाजूंचे खासदार आमने-सामने आले. यानंतरच धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे.
राहुल गांधींनी धक्का दिला, प्रताप सारंगींचा आरोप
भाजप आणि काँग्रेस आंदोलनानंतर खासदार प्रताप सारंगी माध्यमांसमोर आले. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. रक्तही निघत होते. सारंगी यांनी राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.
Edited by – Unmesh Khandale