Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशAustralian Citizen : ऑस्ट्रेलियाच्या डोनाल्ड सॅम्सवर भारतात अंत्यसंस्कार, कारण काय?

Australian Citizen : ऑस्ट्रेलियाच्या डोनाल्ड सॅम्सवर भारतात अंत्यसंस्कार, कारण काय?

Subscribe

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या डोनाल्ड सॅम्स नामक व्यक्तीचे भारतात पर्यटनासाठी आल्यानंतर निधन झाले. पण त्याच्या मृतदेहाला मायदेशी न नेता इथेच भारतातच बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिहार : सध्या परदेशातील अनेक लोक भारतीय संस्कृती मोठ्या आनंदाने स्वीकारू लागले आहेत. मग ती गोष्ट धर्माशी संबंधित असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टीशी. त्यामुळे परदेशातील लोकांना भारतीय संस्कृतीची भुरळ पडली आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. अशाच एका परदेशी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर भारतात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या डोनाल्ड सॅम्स नामक व्यक्तीचे भारतात पर्यटनासाठी आल्यानंतर निधन झाले. पण त्याच्या मृतदेहाला मायदेशी न नेता इथेच भारतातच बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्डने तशी अंतिम इच्छा त्याच्या मृत्यूपत्रात लिहिली होती. (Australian Citizen Donald Sams Funeral in India)

नेमकी घटना काय?

ऑस्ट्रेलियात राहणारा डोनाल्ड सॅम्स हा 12 व्यांदा भारतात फिरण्यासाठी आला. डोनाल्ड 10 फेब्रुवारीला भारतात आला. यावेळी त्याचा ग्रुपसुद्धा त्याच्यासोबत होता. सुरुवातीला तो ग्रुपसोबत कोलकातावरून पाटणाला आला. त्याने यावेळी गंगा नदीच्या पात्रातून प्रवास केला. यानंतर 21 फेब्रुवारीला रात्री डोनाल्ड सॅम्स हा मुंगेरमधील बबुआ घाटावर आला. त्यावेळी अचानक त्याची प्रकृती बिघडली. यानंतर मुंगेर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्याला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाची माहिती मुंगेर प्रशासनाकडून भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील दूतावासाशी संपर्क करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाने परवानगी दिल्यानंतर त्याच्या नातेवाईकांचीही परवानगी घेण्यात आली. सर्वांची सहमती मिळाल्यानंतर डोनाल्ड यांच्यावर मुंगेर येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा… Mahakumbh : महाकुंभमेळ्यावरून परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 6 ठार

एका पादरीला बोलवून चुरंबा येथील ख्रिश्चन दफनभूमीमध्ये डोनाल्ड सॅम्स याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याची पत्नी एलिस होती. डोनाल्ड यांच्यावर शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्याची इच्छा एलिस यांनी व्यक्त केली होती. याबाबत मुंगेरचे जिल्हाधिकारी अवनीश कुमार सिंह यांनी माहिती देत सांगितले की, पार्थिवासह क्रूज जहाज 21 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून 22 फेब्रुवारी दुपारपर्यंत बबुआ घाटावर उभे होते. एलिस यांच्या इच्छेनुसार शवविच्छेदन करण्यात आले नाही.

डोनाल्डवर भारतात अंत्यसंस्कार का?

डोनाल्ड सॅम्स याचा भारतात मृत्यू झालेला असला तरी त्याच्यावर त्याच्या मायदेशी अंत्यसंस्कार करता येऊ शकत होतो. परंतु, तसे न करता त्याच्यावर भारतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. पण असे नेमके का करण्यात आले? याबाबत डोनाल्ड याची पत्नी एलिस सॅम्स हिने सांगितले की, डोनाल्ड सॅम्स याचे वडील ब्रिटिश शासन असताना आसामध्ये ब्रिटिश लष्करात अधिकारी होते. त्यामुळेच त्याने मृत्यूपत्रात स्वतःवर भारतात अंत्यसंस्कार करण्याची इच्छा नमूद केलेली होती. योगायोगाने भारत भेटीवर असतानाच त्याचे निधन झाले. भारताबद्दल डोनाल्डला विशेष आपुलकी होती. तो ज्या ज्या वेळी भारतात यायचा, तेव्हा कोलकातावरून पाटणाचा प्रवास करायचा आणि आसामलाही भेट द्यायचा.