न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला

सल्मान रश्दींवर प्राणघातक हल्ला झाला. न्यूयॉर्कमधील बफेलोजवळच्या चौटौकात ही घटना घडली

salman rashdi

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील बफेलोजवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकून वार करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. मिडनाईट्स चिल्ड्रन हे सलमान रश्दी यांचे गाजलेले पुस्तक आहे.

पुस्तकामुळे वाद –

सलमान रश्दी हे एक जागतिक किर्तीचे लेखक आहेत. त्यांना बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. 1980 च्या दशकात सलमान यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे वाद ओढावला होता. खासकरुन मुस्लिम समाजात त्यांच्या पुस्तकामुळे वाद झाला होता. विशेष म्हणजे एका धार्मिक नेत्याने त्यांच्या हत्येचा फतवा देखील काढला होता.

कोण आहेत सलमान रश्दी –

सर अहमद सलमान रश्दी यांचा जन्म 19 जून 1947 मध्ये झाला. ते ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि लेखक आहेत. त्यांच्या मिडनाईट्स चिल्ड्रेन या दुसऱ्या कादंबरीला 1981 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांची चौथी कादंबरी सॅटानिक व्हर्सेस ही वादाचं केंद्र ठरली होती. या कादंबरीला अनेक मुस्लिम देशांनी जोरदार विरोध केला. काही भागात तर हिंसक आंदोलनं झाली होती. या पार्श्वभूमीवर रश्दी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.1989 मध्ये ईराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खौमैनी यांनी एक फतवाही काढला होता. या पार्श्वभूमीवर रश्दी यांना तब्बल एक दशक भूमिगत व्हावे लागले होते.

पंतप्रधान राजीव गांधी घातली होती पुस्तकावर बंदी –

त्यांच्या पुस्तकात महंमद पैगंबराची निंदा आहे असा आरोप करत भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी रश्दी यांच्या सॅटानिक व्हर्सेस या पुस्तकावर बंद घातली होती. मात्र, अशी बंदी घालणे ही राजीव गांधी यांची चूक होती असे माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी 2015 मध्ये म्हटले होते.