घरदेश-विदेशayush summit 2022 : पंतप्रधानांनी डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांना दिले ‘तुलसीभाई’ हे...

ayush summit 2022 : पंतप्रधानांनी डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांना दिले ‘तुलसीभाई’ हे गुजराती नाव

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन केले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस उपस्थित होते. केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, सर्वानंद सोनोवाल, मुंजपारा महेंद्रभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते.  तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सुमारे 90 प्रख्यात वक्ते आणि 100 प्रतिनिधींसह 5 पूर्ण सत्रे, 8 गोलमेज, 6 कार्यशाळा आणि 2 परिसंवाद होणार आहेत. ही  परिषद, गुंतवणुकीची क्षमता वृद्धी करण्यात मदत करेल आणि नवकल्पना, संशोधन आणि विकास, स्टार्ट-अप परिसंस्था तसेच आरोग्यदायी  उद्योगाला चालना देईल. उद्योगातील नेतृत्व, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांना एकत्र आणण्यास ही परिषद मदत करेल तसेच भविष्यातील सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

पंतप्रधानांनी एका वैयक्तिक आणि रोचक उल्लेखाने आपले भाषण संपवले. भारताबद्दल डॉक्टर टेड्रोस घेब्रेयेसस यांना असलेले प्रेम, त्यांच्या भारतीय शिक्षकांबद्दलचा आदर आणि गुजरातबद्दलची त्यांची ओढ हे सांगताना मोदी यांनी तुलसी भाई असे गुजराती नाव त्यांना दिले. भारतीय परंपरेत तुळशीला असलेले अध्यात्मिक आणि सर्वोच्च स्थान याचे वर्णन केले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांचे आभार मानले.

- Advertisement -

आयुष उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांत केलेल्या अभूतपूर्व प्रयत्नांचे पंतप्रधानांनी वर्णन केले. इतर देशांत आयुष औषधांना परस्पर मान्यता मिळवून देण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी गेल्या काही वर्षांत विविध देशांसोबत 50 हून अधिक सामंजस्य करार झाले आहेत. “आमचे आयुष तज्ञ भारतीय मानक ब्युरोच्या सहकार्याने आयएसओ (ISO) मानके विकसित करत आहेत. यामुळे 150 हून अधिक देशांमध्ये आयुषला मोठी निर्यात बाजारपेठ मिळेल”, असेही पंतप्रधान म्हणाले.

मोदींनी असेही सांगितले, की भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानदंड प्राधिकरण (FSSAI) ने गेल्या आठवड्यात त्यांच्या नियमांमध्ये ‘आयुष आहार’ नामक नवीन श्रेणी जाहीर केली आहे. यामुळे वनस्पतीजन्य पोषण पूरक आहार उत्पादकांना मोठ्या प्रमाणात संधी लाभेल. त्याचप्रमाणे भारत एक खास आयुष चिन्ह देखील बनवणार आहे. ही खूण भारतात बनवलेल्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांना लागू केली जाईल. हे आयुष चिन्ह आधुनिक तंत्रज्ञानाच्या तरतुदींनी सुसज्ज असेल. “यामुळे जगभरातील लोकांचा दर्जेदार आयुष उत्पादनांचा विश्वास मिळवता येईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

- Advertisement -

देशभरात आयुष उत्पादनांचा प्रचार, संशोधन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देशभरात आयुष पार्कचे जाळे विकसित करेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. या आयुष पार्क्समुळे  देशातील आयुष उत्पादनाला नवी दिशा मिळेल, असे मोदी म्हणाले.

पारंपरीक औषधांच्या क्षमतेबाबत बोलताना पंतप्रधानांनी केरळातील पर्यटन व्यवसायवाढीत  पारंपरिक उपचारांची भूमिका असल्याचे नमूद केले.  ही क्षमता भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. या दशकात ‘हील इन इंडिया’ हा एक मोठा ब्रँड बनेल असेही ते म्हणाले. आयुर्वेद, युनानी, सिद्ध या उपचारपद्धतीची केंद्रे लोकप्रिय होतील. याला अजून चालना देण्यासाठी सरकार आयुष उपचार घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी काही पावले उचलेल असे पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले. ”लवकरच, भारत एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे. आयुष उपचारासाठी भारतात येणाऱ्या लोकांना याचा उपयोग होईल” असे पंतप्रधानांनी जाहीर केले.

आयुष क्षेत्राने केलेल्या प्रगतीचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले, “आम्ही याआधीच आयुष औषधे, पूरक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात अभूतपूर्व वृद्धी झालेली पाहिली आहे. 2014 मध्ये, जिथे आयुष क्षेत्र 3 बिलियन डाॅलर्सपेक्षा कमी होते, आज ते 18 बिलियन अमेरिकन डाॅलर्सपेक्षा अधिक झाले आहे. “ते म्हणाले, की पारंपारिक औषधांच्या क्षेत्रात स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. अलिकडेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने विकसित केलेल्या उष्मायन केंद्राचे (इनक्यूबेटर सेंटर) उदघाटन करण्यात आले आहे, अशी माहिती मोदींनी दिली. सध्याचे युग, युनिकॉर्नचे युग आहे, असे सार्थ वर्णन करत, पंतप्रधानांनी सांगितले की 2022 मध्ये, आतापर्यंत भारतातील 14 स्टार्ट-अप युनिकॉर्न समूह सामील झाले आहेत. “मला खात्री आहे की, आमच्या आयुष स्टार्टअप्समधून अधिकाधिक युनिकॉर्न लवकरच उदयास येतील”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय औषधी वनस्पतींचे उत्पादन हे शेतकर्‍यांचे उत्पन्न आणि उपजीविका वाढवण्याचे आणि त्यातून रोजगार निर्मिती करण्याचे एक उत्तम साधन ठरू शकते, हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी शेतकर्‍यांनी औषधी वनस्पती उत्पादन बाजारपेठेशी सहज संपर्क साधण्याच्या सुविधेचे महत्त्व अधोरेखित केले. यासाठी सरकार आयुष ई-मार्केट प्लेसच्या आधुनिकीकरण आणि विस्तारावरही काम करत आहे, असे ते पुढे म्हणाले. “भारत हा वनौषधींचा खजिना आहे, एक प्रकारे ते आपले ‘हिरवे सोने’ आहे” यावर पंतप्रधानांनी भर दिला.


अयोध्ये दौऱ्यात यूपीतील मशिदींवरील भोंगे बंद आहेत का तपासावेत, जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -