घरताज्या घडामोडीBabri Masjid Verdict : २८ वर्षांनी खटल्यातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

Babri Masjid Verdict : २८ वर्षांनी खटल्यातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

Subscribe

बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला असला, तरी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी अजूनही सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. १ सप्टेंबर रोजी ही सुनावणी संपली आणि न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत निकालाचं वाचन राखून ठेवलं होतं. आज न्यायालयाने हे निकालांचं वाचन सुरू केलं. या खटल्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साक्षी महाराज, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, जयप्रकाश गोयल, रामजी गुप्ता यांच्यासह एकूण ४८ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी १६ जणांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाल्यामुळे आता एकूण ३२ आरोपींच्या शिक्षेचा फैसला घटनेच्या २७ वर्षांनंतर आज सुनावण्यात येणार होती. यासाठी एकूण ३२१ साक्षीदार आणि ६०० कागदपत्रांचा समावेश करण्यात आला होता. यावर सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांच्यासमोर तब्बल २ हजार पानांचं हे निकालपत्र होतं. लखनौच्या केसरबाग भागात असलेल्या उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीत ‘अयोध्या प्रकरण कोर्ट’ या नावाने हे विशेष न्यायालय काम करत होतं.

Breaking – न्यायालयानं या प्रकरणातल्या सर्व ३२ आरोपींची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. ‘हा पूर्वनियोजित कट नव्हता. तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांनी बाबरी मशिदीचा विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कारसेवकांनी रागाच्या भरात उत्स्फूर्तपणे बाबरी मशीद पाडली, त्यामागे कोणताही कट नव्हता’, असं स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

‘उपस्थित लाखो कारसेवक कारसेवेसाठी आले होते. तिथे उपस्थित नेत्यांनी ती घटना थांबवण्याचा प्रयत्न केला. ही घटना पूर्वनियोजित नव्हती. सीबीआयने लावलेले आरोप चुकीचे असून आरोपींविरोधातले पुरावे पुरेसे नव्हते, असं न्यायालयानं नमूद केल्याचं बचाव पक्षाच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.

६ डिसेंबरला अयोध्येमध्ये झालेल्या घटनेसाठी कोणत्याही प्रकारचं कट कारस्थान नव्हतं. ते अचानक झालं होतं. आडवाणींच्या नेतृत्त्वात भाजपकडून जे आंदोलन केलं जात होतं त्यात मी सहकार्य करत होतो. त्याचा एकमेव उद्देश जनजागृती करणं हा होता. या निर्णयानं सिद्ध केलं आहे की आमचं आंदोलन षडयंत्र नव्हतं. आता हा वाद संपायला हवा. देशानं राम मंदिराच्या बांधणीसाठी तत्पर व्हायला हवं.

मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ भाजप नेते

- Advertisement -

बाबरी मशीद पाडणं हा पूर्वनियोजित कट नव्हता, असं निरीक्षण या प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कट असल्याचा आजपर्यंतचा दावा यामुळे निराधार ठरत आहे. तसेच, सीबीआयने आपल्या आरोपपत्रात हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा करण्या आला होता. मात्र, न्यायालयानंं हे निरीक्षण नमूद केल्यामुळे या कलमाखाली केलेले आरोपही निराधार ठरू शकतात.

देशात न्याय शिल्लक आहे हे पाहून मला आनंद झाला आहे. बाबरी पडली, त्या दिवशी मी तिथे नव्हतो हे मी कोर्टाला सांगितलं.

डॉ. सतीश प्रधान

बाबरी मशिद प्रकरणातील काही महत्त्वाची नावं

लालकृष्ण अडवाणी
मुरली मनोहर जोशी
महंत नृत्य गोपाल दास
उमा भारती
साक्षी महाराज
कल्याण सिंह
सतीश प्रधान
विनय कटियार
साध्वी ऋतंभरा
जयप्रकाश गोयल
रामजी गुप्ता
चंपत राय बन्सल
राम विलास वेदांती
धर्मदास
संतोष दुबे
अमरनाथ गोयल
लल्लू सिंह
पवन पांडे
विष्णु हरी दालमिया
अशोक सिंघल
गिरीराज किशोरे


हेही वाचा – का झाली सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता? वाचा ही ५ कारणं!

दरम्यान, या ३२ आरोपींमध्ये देखील ६ आरोपी अनुपस्थित होते. त्यात उमा भारती कोरोना बाधित असल्यामुळे त्या अनुपस्थित होत्या. कल्याण सिंह आणि महंत नृत्य गोपाल दास यांना कोरोना होऊन गेला असून ते रिकव्हर होत असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणी, सतीश प्रधान आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली. मात्र, या सगळ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहायला सांगण्यात आलं.

दरम्यान, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. विशेषत: विशेष सीबीआय न्यायालयाच्या परिसरात ही व्यवस्था अधिक कडक होती.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -