(Bail application) नवी दिल्ली : एका जामीन अर्जावर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी एक तिखट टिप्पणी केली आहे. त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. आपल्या अशिलाचे वजन जास्त आहे. त्यामुळे तिला जामीन मंजूर करून तुरुंगातून बाहेर काढावा आणि दिलासा द्यावा, असा युक्तिवाद महिला आरोपीच्या वकिलाने केला. यावर वकिलाने केलेला युक्तिवाद न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी फेटाळून लावला. (SC’s sharp comment on the weight of the accused)
जामीन मागताना आरोपीच्या वकिलाने, अशिलाचे वजन जास्त असल्याच्या केलेल्या युक्तिवादाबाबत न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी असहमती दर्शवली. जामिनासाठी असा युक्तिवाद केला जाऊ शकतो का? की तो जामिनासाठी आधार असू शकतो? असा थेट सवाल त्यांनी केला. यावर, माझा अशील आजारी आहे आणि अनेक समस्यांनी ग्रस्त आहे, असे वकिलाने सांगताच न्यायमूर्ती बेला त्रिवेदी म्हणाल्या, वजन कमी करण्यासाठी तिला कोठडीत राहू द्यावे.
Counsel: The petitioner is overweight.
Justice Bela M. Trivedi: Should that be the ground for relief?
Counsel: I mean, she is having multiple ailments.
Justice Bela M. Trivedi: Let her stay in custody, so that her weight is reduced.#SupremeCourtofIndia pic.twitter.com/Br2XdliQp5
— Bar and Bench (@barandbench) February 28, 2025
न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या या टिप्पणीवर सोशल मीडियावर काही लोकांनी टीकाही केली आहे. न्यायमूर्तींच्या अशा वैयक्तिक टिप्पण्या योग्य नाही. त्यांनी खटल्याबद्दल निरीक्षणे नोंदवायला पाहिजे. आरोपीच्या शरीराबद्दल अशा प्रकारची टिप्पणी करणे असंवेदनशीलता असून ते त्यांच्या न्यायालयीन कार्यकक्षेच्या पलीकडचे असल्याचे काही नेटकर्त्यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे.
न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी यापूर्वीही जामीन प्रकरणांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मे 2024मध्ये जामीन प्रकरणाची सुनावणी करताना त्यांनी याबाबत स्पष्ट मत मांडले होते. जामिनाच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असे मला वाटते. जामिनाची प्रकरणे फक्त उच्च न्यायालयावरच सोपविली पाहिजेत. सर्वोच्च न्यायालय हे जामिनासाठीचे न्यायालय बनले आहे, असे दिसते, असे त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा – EPF : मोठी बातमी! सीबीटीने भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराबाबत घेतला निर्णय