घरदेश-विदेशमंदिरात सेलफोनवर बंदी घाला, मद्रास हायकोर्टाचे तामिळनाडू सरकारला निर्देश

मंदिरात सेलफोनवर बंदी घाला, मद्रास हायकोर्टाचे तामिळनाडू सरकारला निर्देश

Subscribe

मदुराई : मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तामिळनाडू सरकारला मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी खंडपीठाने राज्य सरकारला राज्यभरातील मंदिरात मोबाईल फोन नेण्यास मनाई करण्यास सांगितले आहे.

एम. सीतारामन यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. भाविक मंदिराच्या आवारात फोटो आणि व्हिडीओ घेतात, जे नियमांच्या विरुद्ध आहे. शिवाय, यामुळे मंदिर आणि त्यातील मौल्यवान वस्तूंची सुरक्षा धोक्यात येते. महिला भाविकांचे फोटो देखील त्यांच्या संमतीशिवाय काढले जातील आणि त्यांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती याचिकाकर्त्याने व्यक्त केली होती. ही याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले.

- Advertisement -

मंदिराच्या आत सेलफोन आणि कॅमेरे वापरण्याने भाविकांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे संबंधित मंदिर प्रशासनाद्वारे असे प्रकार नियंत्रित केले जाऊ शकतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

- Advertisement -

संविधानाच्या अनुच्छेद 25नुसार सर्व व्यक्तींना मुक्तपणे धर्म स्वीकारण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे, यात वाद नाही. तथापि, कशा प्रकारे वर्तन करायचे, हे मंदिराच्या आवारातील नियमांच्या अधीन असू शकते. त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने पूजेची शालीनता आणि मंदिराचे पावित्र्य राखले जाईल याची काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने सांगितले

गुरुवायूरमधील कृष्ण मंदिर, मदुराईमधील मीनाक्षी अम्मन मंदिर आणि तिरुपतीमधील श्री व्यंकटेश्वर मंदिर यासारख्या इतर मंदिरांमध्ये सेल फोन वापरण्यावर बंदी घालण्याची उदाहरणे देऊन आणि सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या धार्मिक इतिहासाचा संदर्भ देत न्यायालयाने सांगितले की, असेच निर्बंध इतर मंदिरातही लागू करता येतील. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी, मंदिराच्या आवारात मोबाईल फोन ठेवण्यासाठी आणि सेल फोनचा वापर रोखण्यासाठी सुरक्षित ठेव काउंटर बनवले जाऊ शकतात, असे मतही न्यायालयाने मांडले.

मोबाईल वापरल्याने देवतांच्या पावित्र्याला बाधा पोहोचवण्याबरोबरच भाविकांची सुरक्षा तसेच मंदिर आणि त्यातील मौल्यवान वस्तूंची सुरक्षा धोक्यात येते, अशी याचिकाकर्त्याची तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिराच्या आवारात सेलफोन वापरण्यास बंदी घालणे गरजेचे असून या प्रकरणातील प्रतिवादी अधिकाऱ्यांनी त्यासाठी पावले उचलायला हवीत, असे न्यायालयाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -