केंद्र सरकारने कोरोनावरील उपचारांच्या मार्गदर्शक नियमावलींमध्ये काही बदल केले आहेत. यात कोरोना रुग्णांना स्टेरॉईड देण्याचे टाळण्याबरोबरच दिर्घकाळ खोकल्यासाठी क्षयरोग चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या नव्या मार्गदर्शक नियमावलीमध्ये काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. स्टेरॉईडसारख्या औषधांच्या अतिवापरामुळे कोरोना रुग्णांना इन्वेसिव म्युकोर्मिकोसिस ज्याला ब्लॅक फंगस असे म्हटले जाते त्या संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अशा औषधांचा कमीत कमी वापर करावा, असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना कोणती औषधे किती प्रमाणात देण्यात यावीत हे देखील सूचित करण्यात आले आहे. रुग्णाला जर दोन किंवा तीन आठवड्याहून अधिक काळ खोकल्याचा त्रास होत असेल, तर त्याच्या क्षयरोग चाचणीसह इतर आवश्यक चाचण्या कराव्यात, असेही सांगण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात नीति आयोगाचे सदस्य आणि कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर वी. के. पॉल यांनीदेखील स्टेरॉईडसारख्या औषधांच्या अतिवापरावर चिंता व्यक्त केली होती. कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मोठ्या संख्येने म्युकोर्मिकोसिसची लागण झाल्याचे आढळले होते. याच पार्श्वभूमीवर स्टेरॉईडच्या अतिवापरामुळेच रुग्णांना हा संसर्ग झाल्याचे संशोधनात आढळल्याने कोरोनावरील उपचारांच्या मार्गदर्शक नियमावलींमध्ये बदल करण्यात आले आहेत.
-या नियमावलीत मध्यम ते गंभीर लक्षणे परिस्थितीत रुग्णावर रेमेडिसिवर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर जे रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर नसतील गृहविलगीकरणात असतील अशांवर वरील औषधांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या नव्या नियमावलीनुसार रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल पण जर तो हायपोक्सिया नसेल मात्र श्वासासंदर्भातील तक्रार असेल तर त्याला गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे.
तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र ताप असेल आणि पाच दिवसांहून अधिक दिवस तीव्र खोकला असेल तर अशा रुग्णांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे नियमावलीत सांगण्यात आले आहे.
तसेच ज्या रुग्णांना धाप लागत असेल ऑक्सिजनची पातळी ९०-९३ या दरम्यान असेल त्यांना रुग्णालयात दाखल करता येणार आहे. या रुग्णांना मध्यम लक्षणे असलेले रुग्ण मानले जाईल तसेच त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात येईल.
मात्र जर रुग्णास एक श्वास घेण्यास प्रति ३० मिनिट लागत असतील, धाप लागत असेल ऑक्सिजनची पातळी ९० हून कमी असेल तर अशा रुग्णांना गंभीर रुग्ण म्हणून उपचार दिले जातील. त्यांना आयसीयूत दाखल करावे लागेल. कारण त्यांना ऑक्सिजन सपोर्टची नितांत गरज असेल.