बांगलादेशात भीषण स्फोट; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, ४५० पेक्षा जास्त जखमी

कंटेनर डेपोमध्ये शनिवारी रात्री हा स्फोट झाला असून या अपघातात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

बांगलादेशच्या (Bangladesh) दक्षिण-पूर्व भागातील चिटगांव (Chitgao) शहरात भीषण स्फोट (Blast) झाला आहे. कंटेनर डेपोमध्ये (Container Depot) शनिवारी रात्री हा स्फोट झाला असून या अपघातात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ४५० पेक्षा जास्त कामगार जखमी आहेत. या कामगारांना (Workers) जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे शरीर ६० ते ८० टक्के भाजले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चिटगांव जिल्ह्यांतील सीताकुंड (Sitakund) शहरात एका कंटेनर डेपोमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटाचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र, येथील एका कंटेनरमध्ये रसायने भरून ठेवले होते, ज्यामुळे स्फोटानंतर आग जास्त प्रमाणात भडकली असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

हा स्फोट एवढा भयंकर होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचांना तडा गेला आहे. तसेच, या स्फोटाचा आवाज ४ किलोमीटर अंतरावर ऐकू गेल्या. तसेच, शनिवारी रात्री लागलेल्या आगीवर रविवारी सकाळपर्यंत अग्नीशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत होते.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या डेपोमध्ये ६०० लोक कामगार काम करत असल्याची माहितीही मिळाली. पैकी ४५० लोक जखमी असून १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी २० कामगार गंभीर जखमी असून त्यांचं शरीर ६० ते ८० टक्के भाजले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.