Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशBangladesh : शेख हसीना आणि कुटुंबीयांची मालमत्ता जप्त होणार, न्यायालयाचे आदेश

Bangladesh : शेख हसीना आणि कुटुंबीयांची मालमत्ता जप्त होणार, न्यायालयाचे आदेश

Subscribe

भ्रष्टाचारविरोधी आयोगाने (Anti-Corruption Commission) दाखल केलेल्या अर्जानंतर ढाका मेट्रोपॉलिटन सीनियर स्पेशल जज झाकीर हुसेन गालिब यांनी मंगळवारी शेख हसीना आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध ही कारवाई करण्याचे आदेश दिले.

(Bangladesh) ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. बांगलादेशातील न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे तसेच त्यांच्या नातेवाईकांची बँक खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत. शेख हसिना व्यतिरिक्त, तिच्या मुलासह अनेक नातेवाईकांच्याही मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. (Court orders seizure of Sheikh Hasina’s assets)

बांगलादेशात 5 ऑगस्ट 2024 रोजी अवामी लीगच्या सर्वेसर्वा शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशमधून बाहेर पडत त्या थेट भारतात दाखल झाल्या. त्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ 84 वर्षीय मोहम्मद युनूस यांनी 8 ऑगस्ट 2024 रात्री हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यानंतर देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली. तेथील हिंसाचार नियंत्रणात आला नाही. तसेच, अल्पसंख्याक समाजावरील हल्ले वाढत गेले.

हेही वाचा – Pankaja Munde : कोणत्याही आरोपांवर न बोलणाऱ्या पंकजा मुंडे धसांवर संतापल्या; म्हणाल्या, ‘मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना…’

या पार्श्वभूमीवर ढाका येथील एका न्यायालयाने शेख हसीना यांचे धनमंडी येथील निवासस्थान ‘सुधासदन’ आणि इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. याशिवाय, त्यांच्या कुटुंबाशी निगडीत 124 बँक खाती सील करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. भ्रष्टाचारविरोधी आयोगाने (Anti-Corruption Commission) दाखल केलेल्या अर्जानंतर ढाका मेट्रोपॉलिटन सीनियर स्पेशल जज झाकीर हुसेन गालिब यांनी मंगळवारी शेख हसीना आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध ही कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शेख हसीना यांचा मुलगा साजिद वाझेद जॉय, मुलगी सायमा वाझेद पुटुल, बहीण शेख रेहाना आणि त्यांच्या मुली ट्यूलिप सिद्दीकी आणि रादवान मुजीब सिद्दीकी यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत.

बांगलादेश सैन्यप्रमुखांची कबुली

सत्ताबदल होऊनही देशातील परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले होते. महिला आणि मुलांवरील सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अलीकडेच ढाका येथे मोठ्या संख्येने निषेध मोर्चा काढला होता. एकूणच, देशातील बिघडत्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बांगलादेशचे सैन्यप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी चिंता व्यक्त केली होती. राजकीय उलथापालथीमुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. अलीकडच्या काळात जी अराजकता पाहात आहोत, ती आपणच निर्माण केलेली आहे, अशी कबुलीही जनरल जमान यांनी एका कार्यक्रमात दिली.

हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti Govt : हे राज्य शिवरायांचे नसून मोदींचे झाले…, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल