ढाका : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार काही थांबताना दिसत नाहीत. सातत्याने हिंसाचार आणि अन्यायाला तोंड देणाऱ्या हिंदूंना आता नवीन संकटाला तोंड द्यावे लागते आहे. (bangladesh freezes bank accounts of 17 including arrested hindu leader chinmay krishna das for 30 days)
बांगलादेशातील वित्तीय अधिकाऱ्यांनी इस्कॉनचे माजी सदस्य आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिन्मय कृष्ण दास यांच्यासह अन्य 17 हिंदूंची बॅंक खाती गोठवली आहेत. या खात्यांमधून महिनाभर कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. यासंदर्भातील आदेश सरकारने दिले आहेत. शुक्रवारी स्थानिक ‘प्रथम आलो’ या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले. या वृत्तानुसार, बांगलादेशातील बँकांची आर्थिक गुप्तचर शाखेने (BFIU) वेगवेगळ्या बॅंका आणि आर्थिक संस्थांना यासंदर्भातील आदेश जारी केले. तसेच या खात्यांमधील आर्थिक व्यवहार महिनाभरासाठी थांबवण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – Hindu in Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेबाबत युनूस सरकारने जबाबदारी निभवावी; भारताने बांगलादेशला खडसावले
बांगलादेशातील बँका आणि आर्थिक संस्थांनी या बँक खात्यांशी संबंधित माहिती तीन दिवसात देण्याचे आदेश BFIU ने दिले आहेत. यात संबंधित 17 व्यक्तिंच्या अखत्यारीतील सर्व प्रकारचे व्यवसाय, त्यांची अन्य खाती यातील आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यास सांगितले आहे.
बांगलादेशातील उच्च न्यायालयाने गुरुवारी इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार दिला. देशद्रोहाच्या आरोपांतर्गत बांगलादेश इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तेथे हिंदू समाजाने निदर्शने करण्यास सुरुवात केली. या असंतोषादरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्कॉनवरच बंदीची मागणी होऊ लागली होती.
30 ऑक्टोबर रोजी चटगाव येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्यासह 19 लोकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चटगाव येथील न्यू मार्केट भागात बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप हिंदू समुदायावर ठेवण्यात आला आहे. त्यासाठीच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आचार्य चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि त्यानंतर त्यांना बांगलादेशी न्यायालयाने जामीन नाकारून तुरुंगात पाठवल्या प्रकरणी भारताने चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा – GDP Growth Rate : भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका; दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर घसरला
बांगलादेशातील पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील दास यांच्या सुटकेची मागणी केली आहे. त्यांच्या अटकेविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान वकिलाची हत्या होण्याच्या घटनेचा देखील त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दास यांची बेकायदेशीर अटक आणि त्यांची सुटका न करणे याविरोधात देशातील अल्पसंख्याक हिंदू समाज आक्रमक झाला आहे.
1971 मध्ये मुक्ति संग्रामादरम्यान बांगलादेशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास 22 टक्के हिंदू होते. जे आता 8 टक्क्यांवर आले आहे. (bangladesh freezes bank accounts of 17 including arrested hindu leader chinmay krishna das for 30 days)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar