नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदूंना वारंवार नवनवीन अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागते आहे. आता त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. आसाममधील श्रीभूमी जिल्ह्यात सुरू असलेल्या एका मंदिराचे बांधकाम बांगलादेशी बॉर्डर गार्डनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ हे काम थांबवण्यात आले होते. (bangladesh stops temple construction in assam soldier entered in indian border tension increased)
श्रीभूमि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा गैरसमजूतीचा गोंधळ होता आणि चर्चेअंती यावर तोडगा काढण्यात आला. श्रीभूमी जिल्हा आयुक्त प्रदीप कुमार द्विवेदी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, जिथे हे मंदिर बांधले जाते आहे, तिथे आंतरराष्ट्रीय सीमेवर एक काळ्या रंगाचे प्लास्टिकचे कव्हर होते. या सीमेजवळच मनसा मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांनी, कारागीरांनी तेथेच एक छोटा तंबू बांधला. हा तंबू बघूनच बांगलादेश बॉर्डर गार्डचे सैनिक तिथे आले. या हस्तक्षेपामुळे मंदिर निर्माणाचे काम काही काळ थांबवण्यात आले होते. मात्र, नंतर यासंदर्भातील गैरसमजूत दूर झाल्याने काम पुन्हा सुरू झाले.
हेही वाचा – RBI Governor: संजय मल्होत्रा रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर; 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार
श्रीभूमी जिल्ह्याची (पूर्वेकडील करीमगंज) जवळपास 95 किमी.ची सीमा बांगलादेशाला लागून आहे. यातील जवळपास 40 किमी. ही नदी आहे. या नदीच्या जवळच श्रीभूमी शहरातील एक मोठा भाग येतो. गुरुवारी दुपारी, बांगलादेशातील सिलहट डिव्हिजन येथून बांगलादेश बॉर्डर गार्डचे सैनिक कथितरित्या नदी ओलांडून मंदिर निर्माण होत असलेल्या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात त्यांनी सीमा सुरक्षा दलाला देखील एक पत्र लिहिले आणि येथील काम बंद करण्यास सांगितले.
सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सीमा भागातील फौजा अशाप्रकारे एकमेकांशी बोलत असतात. त्यामुळे यात वेगळे असे काही नाही. नदी ही येथील एक सीमा आहे. त्याचा अर्धा भाग त्यांच्या आणि अर्ध्या भागाकडे आम्ही लक्ष देतो. जेव्हा केव्हा आम्हाला काही वेगळे अनुभवास येते तेव्हा आम्ही परस्परांशी बोलत असतो, असेही त्यांनी सांगितले. आपल्या भागात सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाबाबत त्यांना बोलायचे होते, आणि आम्ही त्यांचे जे काही समज होते ते दूर केले.
बांगलादेशकडून फ्लॅग मीटिंगचा संकेत दाखवल्या गेल्यानंतर सीमा सुरक्षा दलाचे जवान कुशियारा नदीच्या मध्यावर आले, तिथेच बांगलादेशचे जवान देखील आले. तिथेच याबाबत चर्चा करण्यात आली. आसाम पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी तीन लाख मंजूर करण्यात आले आहेत.
हेही वाचा – ASI Vs Waqf : देशभरातील 250 स्मारकांची वक्फच्या नावे नोंदणी, एएसआयचा धक्कादायक अहवाल
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या कथित हल्ल्याच्या विरोधात या आठवड्याच्या सुरुवातीला, आसाममधील बराक घाटी येथे हजारो स्थानिक लोक श्रीभूमी येथील भारत – बांगलादेश सीमेजवळ एकत्र आले. या निदर्शनांदरम्यान, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. तेव्हा निदर्शने करणाऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar