ढाका : बांगलादेशात पुन्हा एकदा विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. शेख हसीना सत्तेत असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलेले हे विद्यार्थी आता महिला आणि मुलांवरील सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार हे गुन्हे रोखण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. ढाका येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने निषेध मोर्चा काढला होता. ‘बलात्काऱ्यांना फाशी द्या…’, ‘महिला आणि मुलांचे रक्षण करा…’ अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या. (Bangladesh: Students protest due to increase in violence against women)
ढाक्यातील जगन्नाथ विद्यापीठ, ईडन कॉलेज, सरकारी तितुमीर कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ लिबरल आर्ट्स बांगलादेश आणि बीआरएसी विद्यापीठातील विद्यार्थी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. देशातील गुन्हे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी बांगलादेशच्या गृह मंत्रालयाच्या सल्लागाराचा राजीनामाही मागितला आहे. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे आम्हाला बाहेर पडायला भीती वाटते. आता विद्यापीठात जाऊनही सुरक्षित वाटत नाही. सरकारकडे आम्ही त्वरित कारवाईची मागणी केली असल्याचे ढाक्याच्या विद्यापीठातील विद्यार्थिनी समीहा चौधरी म्हणाली.
हेही वाचा – Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून…; ठाकरे गटाकडून खळबळजनक आरोप
गुन्हेगारीचा आलेख चढाच
बांगलादेश महिला परिषदेने गेल्या सप्टेंबर महिन्याचा अहवाल सादर केला आहे. सप्टेंबर 2024मध्ये महिला तसेच मुलांविरुद्धच्या हिंसाचारात लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालानुसार, लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या पाच मुली आणि नऊ महिलांनीही आत्महत्या केल्या आहेत. तर, बऱ्याच प्रकरणांमध्ये, गुन्हेगारांनीच पीडितेला मारले आहे.
महिला परिषदेने इतर महिन्यांचेही अहवाल सादर केले आहेत. ऑक्टोबर 2024मध्ये एकूण 200 मुली तसेच महिलांना हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. तर, डिसेंबरमध्ये 163 महिलांवर अत्याचार झाला. जानेवारी 2025मध्ये हा आकडा आणखी वाढला. जानेवारीमध्ये एकूण 205 महिला आणि मुलींना हिंसाचाराचा सामना करावा लागला. शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यापासून बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायांवरील, विशेषतः हिंदूंवरील हिंसाचार वाढला आहे. बांगलादेशातील 48 जिल्ह्यांमध्ये हिंदू आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : ‘साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार,’ संजय राऊतांचा संताप