बलात्कार करुन मुलीला जाळले; बांगलादेशात निर्भया आंदोलन

दिल्ली येथे निर्भया बलात्कार प्रकरणानंतर जसा जनक्षोभ उसळला होता. त्याप्रमाणे तो आता बांगलादेशातील या प्रकरणामुळे उसळला आहे.

Bangladeshi teen burned to death protest for demanding justice
शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार करून तिचा खून. बांगलादेशात निर्भया आंदोलन सुरु

बांगलादेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मदरशात शिकणाऱ्या १८ वर्षीय मुलीवर मदरशाच्या मुख्याध्यापकाने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार दिली. ती तक्रार मागे घेण्यासाठी मुख्याध्यापकाच्या समर्थकाने दबाव टाकला होता. मात्र पीडित मुलगी मागे हटत नाही असे दिसताच समर्थकांनी तिला जाळून मारण्यात आले. हे प्रकरण लोकांना समजल्यानंतर आता सामान्य नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत. भारतात २०१२ साली ज्याप्रमाणे दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर देशभरात निर्भया आंदोलन सुरु झाले होते, त्याप्रमाणे आता ते बांगलादेशमध्ये दिसत आहे.

पीडित तरुणीने २७ मार्च रोजी मदरशाचे मुख्याध्यापक सिराज उद दौला आणि इतरांविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. तरुणीचे म्हणणे होते की आरोपींनी तिला कार्यालयात बोलावून तिला चुकीचा स्पर्श केला होता. हा प्रसंग तिने तिच्या शिक्षकांनाही सांगितला होता, मात्र त्यांनी तिला या विषयाची कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमकावले होते.

या प्रकरणात पोलिसांचीही संशयास्पद भूमिका दिसत आहे. जेव्हा पीडितेने आपली तक्रार दाखल केली होती, तेव्हा पोलिसांनी तिच्या संमतीशिवायच तक्रारीचा व्हिडिओ काढला होता. यावेळी ती तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोलीस तिला चेहऱ्यावरून हात काढण्यासाठी सांगत होते. हा व्हिडिओ नंतर स्थानिक माध्यमात व्हायरल करण्यात आला होता. व्हिडिओच्या प्रकरणानंतर मुख्याध्यापकला अटक करण्यात आली होती. मात्र मुख्याध्यापकाचे समर्थक पीडित तरूणी आणि तिच्या कुटुंबाला धमकावत होते.

दिनांक ६ एप्रिल रोजी काही अज्ञात व्यक्तींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी बुरखा घातला होता, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटलेली नाही. मात्र त्यांनी पीडितेला तिची तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत होते. जेव्हा तिने तक्रार मागे घ्यायला नकार दिला तेव्हा त्यांनी तिला जाळून टाकले. जळालेल्या अवस्थेत पीडितेला डाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ती ८० टक्के भाजले होती. १० एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला.

पीडितेच्या मृत्यूनंतर बांगलादेशात ठिकठिकाणी लोक उस्फुर्तपणे आंदोलन करत आहेत. पीडित तरुणीला न्याय मिळाला पाहीजे, अशी मागणी लोकांकडून होत आहे. तसेच काही लोकांनी सोशल मीडियावर कॅम्पेन देखील सुरु केले आहे. हे आंदोलन उसळल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या काही लोकांना अटक केली आहे. दरम्यान बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा दिली जाईल, असे सांगितले आहे.