बेलवर असणारे जेलमध्ये नक्की जाणार

नरेंद्र मोदींचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा

फाईल फोटो

जे बेलवर बाहेर फिरत आहेत, ते जेलमध्ये नक्की जाणार असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. गुजरात येथील सुरतमध्ये झालेल्या रॅलीत ते बोलत होते. तुम्हाला ठाऊक असेलच की राहुल गांधी सध्या बेलवर मुक्त आहेत. मला हिशोब विचारणारे लोक सध्या बेलवर मुक्त आहेत. त्यांनाही अनेक प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत. ऑगस्टा वेस्टलँड, नॅशनल हेरॉल्ड या केसेसमध्ये गांधी कुटुंबीयांचे हात काळे झाले आहेत. ते दोषी ठरतील आणि जेलमध्ये नक्की जातील, असाही विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या घराण्यापैकी एकानेही विचार केला नसेल की एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होईल आणि प्रश्न विचारेल.

असे म्हणत राहुल गांधी भ्रष्ट नेते आहेत, त्यांच्या घरात भ्रष्टाचाराची परंपरा आहे. त्यांच्यासारखा माणूस माझ्यासारख्या चहावाल्याला जो आपल्या मेहनतीने पंतप्रधानपदापर्यंत पोहचला आहे, त्याला हिशोब कसा मागू शकतात? गेल्या चार पिढ्यापांसून गांधी परिवाराने देश लुटला आहे, असाही आरोप मोदींनी केला. मी भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू केली आहे कारण मी एका सामान्य घरातला माणूस आहे. मला कोणाचीही आणि कसलीही भीती नाही. मी भ्रष्ट असतो तर मलाही भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू करण्यास भीतीच वाटली असती. नोटाबंदीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत, असेही मोदींनी म्हटले आहे.