घरदेश-विदेश‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यात वाजणार शास्त्रीय रागांवर आधारित धून, स्वदेशी 3500 ड्रोनचा...

‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यात वाजणार शास्त्रीय रागांवर आधारित धून, स्वदेशी 3500 ड्रोनचा शो

Subscribe

नवी दिल्ली : यंदाच्या ‘बिटींग द रिट्रीट’ सोहळ्यात भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित वाजवल्या जाणाऱ्या भारतीय धून कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहेत. रविवार, 29 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीच्या केंद्रस्थानी असलेल्या विजय चौक येथे होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रपती तसेच तिन्ही सेनादलांच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. यावेळी लष्कर, नौदल, हवाई दल तसेच राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) म्युझिक बँडकडून अतिशय आकर्षक आणि ठेका धरायला लावणाऱ्या 29 भारतीय धून वाजवल्या जाणार आहेत. याद्वारे लष्कराच्या तुकड्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून बॅरेकमध्ये परतण्यासाठी परवानगी मागतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अग्निवीर धुनने सोहळ्याची सुरुवात होईल. यानंतर ‘अलमोडा’, ‘केदारनाथ’, ‘संगम दार’, ‘सातपुडाची राणी’, ‘भागीरथी’, ‘कोकण सुंदरी’ अशा मोहक धून वाजवणार आहेत. हवाई दलाचे बँड ‘अपराजेय अर्जुन’, ‘चरखा’, ‘वायू शक्ती’, ‘स्वदेशी’ धून वाजवतील. तर नौदलाचा बँड ‘एकला चलो रे’, ‘हम तयार हैं’ आणि ‘जय भारती’ची धून वाजवेल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

- Advertisement -

स्वदेशी बनावटीच्या 3500 ड्रोनचा सहभाग असलेल्या भारताच्या सर्वात मोठ्या ड्रोन शोचे यावेळी सादरीकरण होणार आहे. या भव्य शोमध्ये ड्रोनच्या अतिशय अचूक समन्वयाने राष्ट्रीय व्यक्तिमत्वे तयार करण्यात येणार असून विविध रचनांनी रायसिना हिल्सचे आकाश उजळून निघणार आहे. स्टार्ट अप उपक्रमाचे यश, भारताच्या युवा वर्गाचे तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभूत्व यांचे दर्शन या ड्रोन शोमधून घडेल. मेसर्स बॉटलॅब डायनॅमिक्सने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘बिटींग द रिट्रीट’मधील एका थ्री-डी ऍनामॉर्फिक प्रोजेक्शनचे नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकच्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे मुख्य संयोजक फ्लाइट लेफ्टनंट लिमापोकपम रूपचंद्र सिंग असतील. आर्मी बँडचे नेतृत्व सुभेदार दिग्गर सिंग करतील, तर नौदल आणि हवाई दलाच्या बँडचे नेतृत्व कमांडर एम अँथनी राज आणि वॉरंट ऑफिसर अशोक कुमार करतील.

दरवर्षी 29 जानेवारीला विजय चौकामध्ये ‘बीटिंग रिट्रीट’ कार्यक्रमाने चार दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता होते. या कार्यक्रमात सैन्यदलांचे ‘कलर्स आणि स्टँडर्ड्स’चे संचलन होत असताना हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानाचा कार्यक्रम ठरला आहे. या सोहळ्याची सुरुवात 1950पासून झाली ज्यावेळी भारतीय लष्कराचे मेजर रॉबर्ट्स यांनी सैन्यदलाच्या बँडच्या कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या एका कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची परंपरा लाभलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -