अमित शहांच्या ‘या’ वक्तव्यावर बंगालच्या कोर्टाकडून समन्स

बदनामी झाल्याचा टीएमसी खासदाराचा दावा

amit shah

पश्चिम बंगालमधील एका न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना समन्स बजावला आहे. येत्या २२ फेब्रुवारीला वैयक्तिकरीत्या किंवा वकीलाच्या माध्यमातून हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तृणमुल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची बदनामी केल्याबाबतचे हे प्रकरण आहे. आमदार तसेच खासदारांसाठीचे विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अमित शहा यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या २२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

येत्या सुनावणीसाठी अमित शहा यांनी स्वतः किंवा आपल्या वकीलाच्या मार्फत हजेरी लावावी असे सांगण्यात आले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० नुसार हा समन्स बजावण्यात आला आहे. कोलकात्यामध्ये रॅली दरम्यान अमित शहा यांनी बदनामी करणारी काही वक्तव्ये केल्याचा दावा अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनी केला आहे. अमित शहा यांच्या ११ ऑगस्ट २०१८ च्या कोलकाता दौऱ्यात मायो रोडमध्ये ही बदनामी केल्याचा दावा टीएमसीच्या खासदाराने केला आहे.

काय म्हणाले होते अमित शहा ?

अमित शहा यांनी बंगालमधील दौऱ्यात प्रश्न केला होता की, तुमच्या गावातील रहिवाशांनी पैसे मिळाले का ? तुमच्या गावात हे पैसे पोहचले का ? मोदीजींनी हे पैसे पाठवले आहेत. हे सगळे ३ कोटी ५९ लाख रूपये कुठे गेले ? हे पैसे ममता बॅनर्जीच्या भाच्याला बक्षीस म्हणून तर देण्यात आले नाही ना ? किंवा कोणत्या सिंडिकेटला गेले आहेत. तृणमुल कॉंग्रेसकडून करण्यात येणाऱ्या भ्रष्टाचाराचाच हा एक भाग असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर १३ ऑगस्टला अभिषेक बॅनर्जी यांनी अमित शहा यांना कायदेशीर पाठवली. आपल्याविरूद्ध बदनामीकारक वक्तव्य केल्याचा उल्लेख या नोटीशीत होता. आपले क्लाइंट असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात केलेल्या बदनामीसाठी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे वकीलाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.