गंगासागर मेळा कुंभमेळ्यासारखा ठरणार ‘कोरोना सुपर स्प्रेडर’; आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीजच्या संचालक डॉ. शांता दत्ता यांनीही भीती व्यक्त करत सांगितले की, एवढ्या मोठ्या मेळाव्यात लोकांना नियंत्रित करणे आणि यावेळी कोरोनासंबंधीत सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे कठीण काम आहे.

Bengals Gangasagar Mela Could be A Super spreader Just Like Last Years Kumbh Health Experts Warn
गंगासागर मेळा कुंभमेळ्यासारखा ठरणार कोरोनाचा 'सुपर स्प्रेडर' आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या देश तिसऱ्या लाटेच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशात सागरी बेटावर होणाऱ्या गंगासागर मेळा या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देणे हे कोरोना सुपर स्प्रेडरचे कारण ठरु शकते अशा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. सुपर स्प्रेडरचा अर्थ कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने पसरणे. हरिद्वार, प्रयागराज आणि इतर ठिकाणी कुंभमेळ्याप्रमाणे भरणाऱ्या मेळाव्याला लाखो लोक भेट देत असतात. मात्र हे मेळे, जत्रा कोरोना संसर्ग पसरवण्याचे केंद्र बनू शकतात,असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

संसर्गजन्य रोग आणि बेलियाघाटा जनरल (आयडी अँड बीजी) हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. अनिमा हलदर यांनी सांगितले की, “हा (गंगासागर मेळा) निश्चितच कोरोना सुपर स्प्रेडर ठरेल, यात कोणतेही दुमत नाही. या मेळाव्यात लाखोंच्या संख्येने लोक जमा होतील. त्यामुळे आम्हाला भीती आहे की, या मेळाव्यांमध्ये कोरोना संबंधीत सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन होईल. यामुळे नक्कीच कोरोनाचा प्रसार वाढेल. तर संसर्ग पसरवण्याचे केंद्र बनेल. तर दैनंदिन रुग्णसंख्येतही आताच्या तुलनेत खूप मोठ्याप्रमाणात वाढ होईल.

डॉक्टरांनी लोकांना एकत्र होण्यास बंदी घालण्याची केली मागणी

डॉक्टरांच्या एका मंचाने लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यासाठी कोलकत्ता उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेत 8 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कोलकात्यापासून सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या सागर किनाऱ्यावर वार्षिक गंगासागर मेळा आयोजित न करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी केली होती.

मात्र राज्य सरकारकडून कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाने हा मेळा आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.

डॉ. हलदर यांच्या मताला डॉ. हिरालाल कोणार यांनी सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असून आरोग्य सेवा पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. डॉ कोनार हे ‘पश्चिम बंगाल जॉइंट प्लॅटफॉर्म ऑफ डॉक्टर्स’ च्या संयोजकांपैकी एक आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीजच्या संचालक डॉ. शांता दत्ता यांनीही भीती व्यक्त करत सांगितले की, एवढ्या मोठ्या मेळाव्यात लोकांना नियंत्रित करणे आणि यावेळी कोरोनासंबंधीत सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे कठीण काम आहे. यात “गंगेत डुबकी घेताना अंतर कसे राखले जाईल? असा सवाल उपस्थित करत ते शक्य होणार नाही. असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे व्हायरसचा प्रसार आणखीन वेगाने होण्यास सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले.


Corona: कोरोनाबाधिताच्या संपर्कात असूनही का होत नाही कोरोनाची लागण?; नव्या संशोधनातून आले समोर