नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने अर्थात सीबीआयकडून इंटरपोलच्या धर्तीवर भारतपोलची निर्मिती केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांसारख्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जात होती. पण आता भारतपोलमुळे भारतीय तपास यंत्रणांचे काम अधिक सोपे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मंगळवारी (ता. 07 जानेवारी) करण्यात आले. (BHARATPOL will also provide information on criminals, portal inaugurated by Amit Shah)
भारतपोल या पोर्टलमुळे सायबर क्राइम, फाइनांशियल क्राइम, ऑर्गनाइज्ड क्राइम, ह्यूमन ट्रॅफिकिंग, इंटरनॅशनल क्राइम आदी गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यामुळे राज्यातील पोलिसांना सुद्धा गुन्हेगारांची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. गुन्हे करून परदेशात पळालेल्या गुन्हेगारांची माहिती शोध पथक आणि राज्याच्या पोलीस इंटरपोलकडे मागू शकणार आहेत. पोर्टलच्या माध्यमातून सीबीआय कोणत्याही केसमध्ये सहकार्य मागू शकते. इंटरपोलचे इतर सदस्य देशांच्या शोध पथकाकडेदेखील माहिती मागू शकतात. इतर देशांच्या सहकार्यासाठी क्राइम डेटा आणि गुप्त माहिती शेअर केली जाऊ शकते.
हेही वाचा… Asaram Bapu : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सशर्त जामीन मंजूर
गृह मंत्रालयाने याबाबतची माबिती देत म्हटले की, जगभरात सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाइन दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आदींसह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. अशा गुन्ह्यात अडकलेले गुन्हेगार गुन्हा करून इतर देशात पळून जातात. अशावेळी त्यांना पकडणे स्थानिक पोलिसांसाठी आव्हान बनलेले असते. त्यामुळे अशावेळी तपासादरम्यान अनेक वेळा इतर देशांची मदत घ्यावी लागते.
देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे हे आजही सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे. त्यामुळे यासाठी भारतीय एजन्सी इंटरपोल आणि इतर परदेशी सुरक्षा संस्थांची मदत घेतात. आता भारतपोलच्या माध्यमातून इंटरपोल आणि इतर देशांतून गुन्हेगारांचा डाटा तत्काळ उपलब्ध होणार आहे.
भारतातील इंटरपोलची नोडल एजन्सी असलेल्या सीबीआयने प्रथमच आपल्या तीन अधिकाऱ्यांना इंटरपोलसोबत काम करण्यासाठी परदेशात पाठवले आहे. हे अधिकारी सीबीआय आणि इंटरपोल यांच्यात समन्वयाचे काम करतील. सीबीआयच्या प्रयत्नांमुळे इंटरपोलने ज्या लोकांच्या विरोधात नोटिसा जारी केल्या आहेत त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्यात हे अधिकारी मदत करतील. गेल्या वर्षी सीबीआयने सुमारे 170 इंटरपोल नोटीस बजावल्या आहेत. या नोटिसा जारी करण्याची विनंती विविध तपास यंत्रणा आणि पोलिसांनी केली होती.