Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, आज दुपारी १ वाजता शपथविधी

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, आज दुपारी १ वाजता शपथविधी

भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत.

Related Story

- Advertisement -

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मुख्यमंत्रीपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाईल हे ताडण्यासाठी राजकीय जाणकारांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांच्या पाश्वर्र्भूमीवर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झाले. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले असून सोमवारी दुपारी १ वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचे मुख्यमंत्रीपद गेले आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याआधी देखील ऑगस्ट २०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन पटेल त्यांची जागा घेतील, अशी चर्चा होती. मात्र, तेव्हा देखील त्यांच्याऐवजी रुपाणी यांची निवड करण्यात आली होती. विजय रुपाणी यांचे उत्तराधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री नितीन पटेल, कृषीमंत्री आर. सी. फाल्दु, तसेच केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांची नावे चर्चेत होती.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

- Advertisement -

भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यासोबतच अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांच्यानंतर कोण येणार? या चर्चेमध्ये कुठेही भूपेंद्र पटेल यांचे नाव नव्हते. त्यामुळे विजय रुपाणी यांनी ज्या प्रकारे अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तितक्याच अचानकपणे भूपेंद्र पटेल यांचे देखील नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन जिंकले देखील आहे! २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भूपेंद्र पटेल यांनी १ लाख १७ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. संपूर्ण गुजरातमध्ये २०१७च्या निवडणुकांमध्ये हा सर्वाधिक मतांचा फरक होता.

- Advertisement -