गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री कामत यांच्यासह अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

काँग्रेसचे 11 आमदार गोवा विधानसभेत आहेत. त्यातील 8 आमदार फुटल्यावर आमदारांना निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज नाही. दोन तृतीयांश आमदारांचा गट तयार करून हे नेते भाजपात प्रवेश करतील

पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि इतर काँग्रेस आमदार लवकरच भाजपवासी होणार आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. “आम्ही भाजपमध्ये कधीही सामील होऊ शकतो आणि आम्ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कॉलची वाट पाहत आहोत,” असे एका काँग्रेस आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. कोणत्याही विशिष्ट पदासाठी किंवा मंत्रिपदासाठी कोणतेही आश्वासन दिलेले नाही.

काँग्रेसच्या 8 आमदारांनी गोव्यात बंड केले आहे. कळंगुटचे मायकल लोबो (काँग्रेस), शिवोलीचे डिलायला लोबो (काँग्रेस), कुंभारजुवेचे राजेश फळदेसाय (काँग्रेस), साळगावचे केदार नाईक (काँग्रेस), मुरगांवचे संकल्प आमोणकार (काँग्रेस), नुवेंचे आलेक्स सिकेरा (काँग्रेस), मडगावचे दिगंबर कामत (काँग्रेस), कुंकळीचे युरी आलेमाव (काँग्रेस) हे आठ आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. तीन वर्षांपूर्वी 10 जुलै 2019 रोजी 10 काँग्रेस आमदारांनी बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपात प्रवेश केला होता. सध्या काँग्रेसचे 11 आमदार गोवा विधानसभेत आहेत. त्यातील 8 आमदार फुटल्यावर आमदारांना निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज नाही. दोन तृतीयांश आमदारांचा गट तयार करून हे आमदार भाजपात प्रवेश करतील.

केपेचे अल्टन डिकॉस्ता (काँग्रेस), हळदोणाचे कार्लुस फरेरा (काँग्रेस), सांताक्रूझचे रुदाल्फ फर्नांडिस (काँग्रेस) हे तीन आमदार काँग्रेसमध्येच राहणार आहेत. कामत आणि लोबो या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले असले तरी काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अपात्रता टाळण्यासाठी एकत्रितपणे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गोव्याच्या 40 सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे 11 आमदार आहेत, तर भाजपचे 20 आणि एमजीपीचे 2 सदस्य आणि तीन अपक्ष आहेत.

2024 लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रणनीती

सूत्रांनी सांगितले की, गोव्यातील भाजपची राज्य युनिट काँग्रेस आमदारांना पक्षात घेण्यास फारशी उत्सुक नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून 2019 प्रमाणेच भाजपला दक्षिण गोव्याची जागा जिंकायची आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व मात्र जागा जिंकण्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी काँग्रेस आमदारांना आणण्यास उत्सुक आहेत.

काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जुलै 2019 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत ‘बाबू’ कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या नऊ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. खरे तर 2022 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या आमदारांना चर्च आणि मंदिरासमोर शपथ दिली होती की ते निवडून आल्यानंतर पक्ष सोडणार नाहीत आणि भाजपमध्ये जाणार नाहीत. राजकीय निरीक्षकांनी सांगितले की, काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने गोव्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार भाजपकडे वळण्याची ही दुसरी वेळ आहे.