कोरोना लसीची प्रतिक्षा संपणार? ‘या’ तीन कंपन्या लशीच्या शर्यतीत

आज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची कोरोना लशीसंदर्भात बैठक होणार

Covishield corona vaccine supply at 250rs per dose for government says Adar Poonawalla

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोना लसीसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कोरोनावरील लशीबाबत भारतीयांना नववर्ष प्रारंभीच आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत औषध महानियंत्रकांनी गुरुवारी दिले. दरम्यान, केंद्र सरकार भारतीयांसाठी कोणत्या लसीची आणि कधी घोषणा करणार याकडे देशातील सर्वच नागरिकांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे अवघ्या भारतीयांची प्रतिक्षा आज संपणार आहे.

कोरोना लसीसंदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता असून भारत सरकारकडून कोरोना लसीला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक आणि फायजर शर्यतीत आहेत. या कंपन्यांनी कोव्हिड लसीसंदर्भात सोपवलेल्या अहवालावर आज सीडीएससीओच्या विशेष समितीची बैठक होणार आहे. दरम्यान दुपारी होणाऱ्या बैठकीत लसीला मान्यता देण्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

फायझरच्या लसीला WHO ची मंजूरी

जागतिक आरोग्य संघटनेने फायझर बायोटेक लसीच्या आपातकालीन वापरासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी मान्यता दिली आहे.WHO च्या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयातीचा आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सर्वात आधी ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा तसंच युरोपिअन युनिअन देशांनीही फायझर लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली होती.

देशासह राज्यात ड्राय रन सुरू

दरम्यान पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश आणि आसाम या चार राज्यांमध्ये २८ व २९ डिसेंबरला लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली होती. या राज्यांमधील अनुभवांचा आढावा घेतल्यानंतर देशव्यापी सराव फेरीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. शनिवारी प्रत्येक राज्याच्या राजधानीत ड्राय रन होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांत सराव फेरी होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


उद्या कोरोना लसीकरणाचं राज्यात होणार ड्राय रन; ‘या’ चार जिल्ह्यांची निवड