वाढती महागाई आणि खर्चाचा ताळमेळ बसवताना सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडते. लहान कुटुंब, सुखी कुटुंब असं सरकारही सांगत असते. नागरिकांमध्येही वाढत्या महागाईमुळे लहान कुटुंबावर भर दिला जातो. मात्र जगात असेही लोक आहेत, ज्यांना जगाच्या नियम आणि बंधनाची पर्वा नसते. कुटुंब लहान असावे याच्याशी त्यांचे सोयरसुतक राहात नाही. असेच एक कुटुंब टांझानियामध्ये समोर आले आहे. येथील एका व्यक्तीला कुटुंबकल्याणाचा विचार मनानाही शिवला नसल्याचे दिसते. या व्यक्तीने कुटुंबाचा विस्तार करण्याच्या हौशेपायी 20 लग्न केले. 20 बायकांच्या या दादल्याने तब्बल 104 मुलांना जन्म दिला. एवढेच नाही तर याच्या नातू आणि पणतूंची संख्या 144 वर गेली आहे. पल्स अफ्रिकाच्या एका वृत्तानुसार टांझानियाच्या जोंबे नावाच्या एका छोट्या गावात या परिवाराने आपले स्वतःचेच एक वेगळे गाव वसवले आहे.
अर्नेस्टो मुइनुची नावाच्या व्यक्तीने 20 महिलांसोबत लग्न केले. त्याने प्रत्येक पत्नीला वेगळे घर देखील करुन दिले. प्रत्येक कुटुंबाला आपला उदरनिर्वाह कसा होणार हा यक्ष प्रश्न सतावतो. याचे उत्तर अर्नेस्टोने सहज सोपे करुन टाकले. घरातील ज्या ज्या व्यक्ती बाहेर जाऊन कमाई करु शकतात त्यांनी आपापला उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा असे आदेशच आर्नेस्टोने कुटुंबातील प्रत्येकाला दिले. यामुळे कुटुंबप्रमुखावर पालन पोषणाची जबाबदारी आली नाही. जे मुलं मुली काम करण्यासारखी आहेत, ते स्वतः काम करुन कुटुंबाला मदत करतात.
अर्नेस्टो मुइनुचीचे म्हणणे आहे की त्याच्या वडिलांची इच्छा होती की मोठ्ठ कुटुंब असलं पाहिजे. त्याच्या वडिलांना वाटत होते की, आपले कुटुंब फारच छोटे आहे त्यामुळे त्यांनी मुलाला मोठे कुटुंब करण्याचा सल्ला दिला. अर्नेस्टोला सात बहिणी आहेत.
अर्नेस्टोचा जन्म अफ्रिका स्वतंत्र होत असतानाच झाला, अर्थात 1961 मध्ये झाला. त्याचे वडिल म्हणायचे की एकच पत्नी पुरेशी नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः अर्नेस्टोची पाच लग्न लावून दिले. मुलाचे लग्न लावण्यासाठी त्याच्या वडिलांना काही मुलींना हुंडाही द्यावा लागला. उर्वरीत 15 लग्न अर्नेस्टोने स्वतः केली. त्याच्या 20 पैकी 16 पत्नी हयात आहेत.
हे संपूर्ण कुटुंब शेतीशी संबंधीत कामे करतात. हे अतिभव्य कुटुंब एकत्रित शेती करतात आणि त्याच्यावरच त्यांचे पालन-पोषण होते. केळी, बीन्स आणि मका ही त्यांची प्रमुख पिके आहेत. अर्नेस्टो प्रामाणिकपणे सांगतो की, सर्वांना वाटतं की एवढा मोठा परिवार मी एकटा चालवतो, तर तसं बिल्कूल नाही. माझ्या कुटुंबातील महिलांचा यात प्रमुख वाटा आहे. कुटुंब चालवण्यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच खरं तर सर्व काही चालवतात.
अर्नेस्टोने सांगितले की, कुटुंबात काही वाद झाला तर महिलाच तो मिटवतात. जर वाद फारच विकोपाला गेला तरच माझ्यापर्यंत येतो. मला एवढी मुलं आणि नातू आहेत त्यांची नावंही मी अनेकदा विसरुन जातो. 50 मुलांची नावं मला माहिती आहेत, बाकीच्यांना मी चेहऱ्यानेच ओळखतो, त्यांची नावंही मला माहित नाहीत. अर्नेस्टोच्या 40 मुलांचा मृत्यू झाला आहे, यातील काहींचा मृत्यू आजारपणामुळे तर काही अपघातात दगावले.
हेही वाचा : Praniti Shinde : धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स; प्रणिती शिंदेंचा महायुतीवर हल्लाबोल