कोरोना संरक्षक छत्री, बिहारच्या विद्यार्थ्याचा अविष्कार

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जग कामाला लागलं असून अद्यापही त्यात कोणालाही य़श मिळालेले नाही. पण बिहारमधील एका विद्यार्थ्यांने कोरोनापासून संरक्षण करणारी छत्री तयार करून सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. या छत्रीला सरकारी मान्यता मिळावी यासाठी तो प्रयत्न करत आहे. विनित असे या तरुण विद्यार्थ्याचे नाव आहे.

बिहारमधील औरंगाबामध्ये राहणाऱ्या या तरुणाने बनवलेली ही छत्री उघडताच तुमच्या अंगावर आपोआप सॅनिटायजर शिंपडले जाते. तसेच या छत्रीमध्ये हात धुण्यासाठी सॅनेटायजरची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नाही तर यात मास्कही तुम्ही ठेवू शकणार आहात. तसेच कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी या छत्रीत आहेत. सामान्य छत्रीप्रमाणेच ही छत्री तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता.या छत्रीची किंमत तीनशे रुपये आहे. छत्री उघडताच आतील बटन दाबले जाते. त्यामुळे छत्रीमध्ये लावण्यात आलेले सॅनेटायझर चारही बाजूने तमच्यावर शिंप़डले जाते. यामुळे छत्री सॅनिटाईज होते. त्यामुळे व्यक्तीही सुरक्षित होते.

या छत्रीला पेटेंट मिळावे यासाठी छत्री सीएसआयआर (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च) कडे पाठवण्यात आली आहे. पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही असे विनितने सांगितले आहे. विनित सतत नवीन प्रयोग करत असतो. याआधीही त्याने प्लास्टीकपासून पेट्रॉल बनवण्याचा प्रयत्न केला होता. बाल वैज्ञानिक म्हणून तो गावात ओळखला जातो.