घरताज्या घडामोडीजेवढे जास्त शिक्षण, तेवढी कमी मुलं... नितीशकुमारांच्या दाव्यावर BJP महिला आमदार संतप्त;...

जेवढे जास्त शिक्षण, तेवढी कमी मुलं… नितीशकुमारांच्या दाव्यावर BJP महिला आमदार संतप्त; आकडे काय सांगतात?

Subscribe

पाटणा – बिहराचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या एका वक्तव्याने राष्ट्रीय राजकारणात धुराळा उडालाय. नितीशकुमारांनी विधानसभेत वाढत्या लोकसंख्येला महिलांच्या शिक्षणाला जबाबदार ठरवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महिला शिकल्या-सवरलेल्या असतील तर लोकसंख्या नियंत्रणात राहील. शिक्षित महिलांमध्ये पुरुषांना नाही म्हणण्याची हिंमत आणि ताकद असते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar CM Nitishkumar) यांनी जातीनिहाय सर्वेक्षणाचे आकडे विधानसभेत सादर केले. यात विविध जात समूहांच्या आर्थिक स्थितीचीही आकडेवारी समोर आली आहे. त्यासोबतच कोणत्या समाजात शिक्षणाचे प्रमाण किती, हे देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने गदारोळ उडाला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले नितीशकुमार!

नितीशकुमार म्हणाले, “मुलगी शिकलेली असेल. आणि जेव्हा मुला-मुलीचे लग्न होईल. तेव्हा पुरुष जेव्हा रोजरात्री संबंध निर्माण करेल तेव्हाच मुलांचा जन्म होतो. मात्र मुलगी शिकलेली असेल तर ती त्याला विरोध करते. त्यामुळेच (शिक्षित मुलींमुळे) लोकसंख्या घटत आहे.”

- Advertisement -

नितीशकुमार यांचा बोलण्याचा अंदाज आणि शब्दांची निवड यावर महिला आमदारांनी नाराजी व्यक्त केली, तर पुरुष सदस्यांमध्ये खसखस पिकली होती.

भाजप आमदार निक्की हेम्ब्रम म्हणाल्या, मुख्यमंत्री हे भाषेची मर्यादा राखतही बोलू शकले असते. बिहार भाजपने ट्विट करुन नितीशकुमार यांना ‘अश्लिल नेता’ म्हटले आहे. नितीशकुमार यांनी सभागृहात पहिल्यांदाच असे वक्तव्य केलेले नाही, तर जानेवारीमध्येही अशाच पद्धतीचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, “पुरुषांना लक्षात राहात नाही की आपल्याला मुल जन्माला घालायचे नाही. महिला शिकलेली असेल तर तिला सर्व गोष्टींची जाणीव असते, की यापासून आपण कसं स्वतःला वाचवायचं.”

- Advertisement -

लोकसंख्येत तिसऱ्या क्रमांकावर, साक्षरतेत सर्वात खालच्या पायरीवर

लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानंतर बिहार तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र साक्षरतेचा दर पाहिला तर बिहारचा नंबर खालून पहिला आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-5 (NFHS-5) च्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुरुष आणि महिलांच्या साक्षरतेमध्ये 20% पेक्षा जास्त अंतर आहे.
बिहारमध्ये पुरुष साक्षरतेचा दर 76% आहे, तर महिला साक्षरता 55% आहे. याचाच अर्थ 100 पैकी 76 पुरुष आणि 55 महिला साक्षर आहे.

शिक्षण आणि लोकसंख्येचं कनेक्शन

शिक्षणाने पुरुष असेल नाही तर महिला, कोणत्याही समजदार व्यक्तीला एक सामाजिक, आर्थिक भान येते, असे मानले जाते. एका उदाहरणाने हे समजून घेऊया,
केरळ देशातील सर्वात शिक्षित राज्य आहे. 2011 च्या जनगणनेनुसार तिथे शिक्षणाचे प्रमाण 94% आहे.
केरळमधील महिला साक्षरतेचा दर 1991 मध्ये 86% होता, जो 2001 मध्ये वाढून 88% झाला. 2011 मध्ये यात वाढ होऊन 92% झाला. यामुळे लोकसंख्या वाढीच्या दरावर मोठा परिणाम झालेला दिसून येतो.
1991 ते 2001 दरम्यान केरळच्या लोकसंख्या वाढीचा दर 9.32% होता. तर 2001 ते 2011 दरम्यान या राज्याची लोकसंख्या 4.9% वाढली आहे.

याच पद्धतीने बिहारची आकडेवारी पाहिली तर 2001 मध्ये महिलांचा साक्षरता दर 33 टक्के होता, जो 2011मध्ये वाढून 53 टक्के झाला. याचा परिणाम लोकसंख्या वाढीवरही झालेला दिसला. 1991 ते 2001 दरम्यान बिहारमध्ये 29% दराने लोकसंख्या वाढत होती. 2001 ते 2011 च्या दरम्यान यात थोडी घट होऊन हा दर 25% वर आला.

एवढचं नाही तर सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टमच्या 2020 च्या अहवालानुसार, शिक्षण आणि प्रजनन दर (फर्टिलिटी रेट) याचा थेट संबंध आहे. हा रिपोर्ट एवढा बोलका आहे की, अशिक्षित महिलांमध्ये फर्टिलिटी रेट 3.1 आहे, तर शिक्षित महिलांमध्ये हाच दर 1.9 आहे.

फर्टिलिटी रेट म्हणजे काय ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येनुसार, फर्टिलिटी रेट म्हणजे, एक महिला तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देते किंवा देऊ शकते, याला फर्टिलिटी रेट अर्थात प्रजनन दर म्हटले जाते.

एमआरएसचा अहवाल सांगतो, की एक अशिक्षित महिला तिच्या जीवनकाळात सरासरी तीन मुलांना जन्म देते. तर शिक्षित महिला ही दोन किंवा त्याहीपेक्षा कमी मुलांना जन्म देते. महिलांमध्ये फर्टिलिटी रेट हा त्यांचे शिक्षण वाढल्यानंतर कमी होत जातो. उदाहरणार्थ 10 वीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलांमध्ये फर्टिलिटी रेट 1.9 आहे. 12वी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्या महिलांमध्ये फर्टिलिटी रेट 1.8 आहे तर शाळेत न जाणाऱ्या महिला त्यांच्या आयुष्यात 2.8 मुलांना जन्म देतात, किंवा देऊ शकतात. तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांमध्ये हा दर 1.6 आहे.

वास्तविक बिहार यामध्ये अतिशय मागास आहे. बिहारमध्ये शिक्षित महिलांमध्ये फर्टिलिटी रेट 2.8 आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा (1.9) खूप जास्त आहे. त्याच पद्धतीने अशिक्षित महिलांमध्ये फर्टिलिटी रेट 3.8 आहे तर राष्ट्रीय सरासरी 3.1 आहे.

शिक्षण आणि वाढत्या लोकसंख्येचं कनेक्शन
दोन मुलांमधील जन्माचं अंतर साधारण 36 महिने असलं पाहिजे. भारतामध्ये दोन मुलांमधील अंतर साधारण 32.7 महिने आहे. मुलांमधील अंतरावरही शिक्षणाचा परिणाम होतो.
शिक्षित महिलांच्या दोन मुलांमधील अंतर साधारण 36.1 महिने असल्याचे पाहायला मिळते.
मात्र शाळेत कधीच न गेलेल्या महिलांच्या दोन मुलांमध्ये साधारण 30.9 महिन्यांचे अंतर असते.
– भारतात साधारण एक महिला सरासरी वयाच्या 21.2 वर्षी पहिल्या बाळाला जन्म देते. जर ती कधीच शाळेत गेलेली नसेल तर सरासरी वयाच्या 19.9 वर्षी तिला पहिले बाळ होते. मात्र जर ती 12 वीपर्यंत शिकलेली असेल तर तिच्या वयाच्या 24.9 वर्षी तिला पहिले आपत्य होते.
– मुलींमध्ये जस-जसे शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे, त्याच पद्धतीने शाळकरी वयात गर्भवती होण्याचे प्रमाणही कमीकमी होत आहे. ज्यांनी कधीही शाळेचे तोंड पाहिलेले नाही, अशा टीनेज – 15 ते 19 वर्षांच्या 18 टक्के मुलींमध्ये प्रेग्नेंसी पाहायला मिळते. तर दुसरीकडे, ज्यांचे शिक्षण 12 वीपर्यंत झाले आहे अशा फक्त चार टक्के महिलांमध्ये टीनेज प्रेग्नेंसी आढळून आली आहे.

कुटुंबनियोजन फक्त महिलांची जबाबदारी आहे का?

ज्या पद्धतीने नितीशकुमार म्हणाले, की पुरुषांना भान राहात नाही, अशावेळी हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो, की कुटुंबनियोजनची जबाबदारी फक्त महिलांची आहे का?
– भारतातील एक तृतियांश पुरुषांचे हेच मत आहे की कुटुंबनियोजन ही महिलांची जबाबदारी आहे.
– राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वे-5 नुसार, 35 टक्क्यांपेक्षा जास्त पुरुषांचे मत आहे की फॅमिली प्लॅनिंगचे काम महिलांचे आहे, त्यांना या गोष्टीशी काहीही देणेघेणे नाही. बिहारमध्ये असा विचार करणाऱ्या पुरुषांची संख्या 50 टक्के आहे.
– एवढंच नाही तर, देशातील 20 टक्के पुरुषांचे असं मत आहे की जर एखादी महिला कंडोम सारख्या गर्भनिरोधकांचा वापर करत असेल तर तिचे अन्य पुरुषांसोबत संबंध असू शकतात.
– भारतात 97% पुरुषांना आणि 87% महिलांना कंडोमबद्दल माहिती आहे. 55% पुरुषांचे मत आहे की जर कंडोमचा योग्य वापर केला तर नको असलेली गर्भधारणा रोखता येऊ शकते. मात्र असे असतानाही देशात फक्त 9.5% पुरुषच कंडोमचा वापर करतात. म्हणजेच, 10 पैकी फक्त एक पुरुष कंडोमचा वापर करतात.
या सर्व आकडेवारीवरुन हेच स्पष्ट होते, की शिक्षण आणि गर्भधारणा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -