Bihar Election 2020 : निकाल यायला रात्र होणार, उशिरापर्यंत चालणार मतमोजणी!

bihar election 2020

बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. दुपारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राजद-काँग्रेस महागठबंधनला मागे टाकत भाजप-जदयूनं आघाडी घेतली आहे. मात्र, निवडणुकांचे निकाल यायला रात्र होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं आहे. दुपारी १ वाजेपर्यंत बिहारच्या सुमारे ४ कोटी १० लाख मतांपैकी अवघ्या १ कोटी मतांची मोजणी झाली होती. त्यामुळे उरलेल्या ३ कोटी मतांची मोजणी व्हायला रात्र होणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आत्ता समोर येत असलेल्या आकडेवारीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारचे निवडणूक आयुक्त एच. आर. श्रीनिवास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सामान्यपणे मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतात. त्यामुळे संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमांमुळे यावेळी तब्बल ३५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे उशीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

बिहार निवडणुकांसाठी भाजप आणि जदयुनं एनडीएच्या एका छत्राखाली निवडणुका लढवल्या. यामध्ये आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीवरून या युतीचा फायदा भाजपला झाला असून जदयूच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राजद-काँग्रेस महागठबंधनमध्ये काँग्रेसनं राजदच्या कोट्यातल्या जागा देखील घेऊन लढवूनही त्या जिंकून आणण्यात काँग्रेसला अपयशच येत असल्याचं दिसून येत आहे.