बिहारमध्ये जेडीयू- बीजेपी युती अखेर तुटली; जेडीयू- आरजेडीसोबत स्थापन करणार नवं सरकार

bihar political crisis 2022 Nitish Kumar decides to end alliance with BJP in meeting with JDU MLAs

बिहार : महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपचं ऑपरेशन लोट्स चालू दिले नाही. ज्यानंतर बिहारमध्ये जेडीयूने अखेर भाजपसोबतची युती तोडली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या सहकार्याने नवं सरकार स्थापन होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील नव्या सरकारला काँग्रेसनेही पाठींबा जाहीर केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री नितीश दुपारी 4 वाजता राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेणार आहेत. दरम्यान जेडीयूच्या आजच्या बैठकीत पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाजपसोबत युती तोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे, सर्व नेत्यांनी आपण त्यांच्यासोबत आहेत. ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असणार आहोत. असं म्हटले आहे.

बिहारमधील या सत्ताबदलाच्या घडामोडींवर आता लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्विट केले आहे. रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून लिहिले की, राज्याभिषेकाची तयारी करा, कंदील धारक येत आहेत.

यामुळे बिहारमधील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. नितीश यांच्यासोबत तेजस्वी यादव देखील राज्यपालांना भेटायला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सीएम नितीश आपला राजीनामाही देऊ शकतात. अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीयूमध्ये राजकीय वाद निर्माण झाला. ज्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमधील तणाव वाढत गेला. ज्यानंतर जेडीयू आणि भाजपमधील राजकीय वाद इतके टोकाला गेली की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रातील मोदी सरकारला वारंवार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्राच्या नीती आयोगाच्या बैठकीला गैरहजेरी लावत भाजपवरील आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नितीश कुमार यांनी भाजपच्या ऑपरेशन लोट्सला सुरुंग लावला आहे.


बिहारमधील राजकीय समीकरणं बदणार? : मुख्यमंत्र्यांनी आज जेडीयूच्या आमदार- खासदारांची बोलवली बैठक