रायपूर : छत्तीसगडमधील बस्तरमधील वास्तव समोर आणणारे निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. 28 वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर 1 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू होता मात्र, शुक्रवार (3 जानेवारी) त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. मुकेश चंद्राकार यांचा शवविच्छेदन अहवालही आता समोर आला आहे. त्यानुसार चंद्राकार यांना अत्यंत निर्दयतेने मारण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (bijapur journalist mukesh chandrakar postmortem report fatal injury hand bone fractured heart and liver tear)
10 वर्षांपासून मुकेश चंद्राकार यांनी गेली छत्तीसगडमधील बस्तरचे वास्तव जगासमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्या बस्तर जंक्शन या यूट्युब चॅनलद्वारे माओवाद्यांच्या कॅम्पचे थेट प्रक्षेपण करत खळबळ उडवली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यातून चंद्राकार यांना किती क्रूरतेने मारण्यात आले, याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा – Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; 7 जवान शहीद, 8 गंभीर जखमी
मुकेश यांना अत्यंत हाल हाल करून मारण्यात आले. त्यांचे लिव्हर चार तुकड्यात सापडले, तर मानेचे हाड देखील तुटलेले होते. याशिवाय हाताच्या हाडाचे देखील दोन तुकडे सापडले. हृदय पूर्णपणे फाटलेले होते. डोक्यावरही 15 गंभीर जखमा आहेत.
आपल्या 12 वर्षांच्या सेवेमध्ये कोणालाही एवढ्या क्रूरतेने मारलेले पाहिले नसल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यांना अत्यंत थंड डोक्याने आणि निष्ठूरतेने मारण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुकेश चंद्राकार यांना मारून ठेकेदार सुरेश चंद्राकार यांनी हा मृतदेह टाकीत टाकला होता.
पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येने राज्य तसेच देशात खळबळ उडाली आहे. मुकेशची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी ठेकेदार सुरेश चंद्राकर याला रविवारी रात्री एसआयटी पथकाने हैदराबाद येथून अटक केली आहे. सध्या त्याला बिजापूर येथे आणण्यात येत आहे. तेथेच पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, सुरेश चंद्राकर याच्या पत्नीला देखील कांकेर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्याप्रकरणात सहभागी रितेश चंद्राकर, दिनेश चंद्राकर आणि महेंद्र रामटेके यांना आधीच अटक करण्यात आली आहे. सध्या ते तुरुंगात आहेत.
बीजापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुकेशने आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक अडचणींवर मात केली. ईटीव्हीवरून पत्रकारितेची सुरुवात करत, नंतर न्यूज 18 छत्तीसगड आणि शेवटी बस्तर जंक्शन या यूट्यूब चॅनलद्वारे त्यांनी दंडकारण्यातील आदिवासींच्या व्यथा, माओवादी चळवळींचे वास्तव आणि सुरक्षा दलांचा संघर्ष प्रभावीपणे मांडला.
हेही वाचा – Sunil Tatkare : अजित पवारांचे बारामतीतील भाषणाबाबत सुनील तटकरे म्हणतात, अतिशयोक्ती…
माओवादी चळवळींचा अभ्यास करून त्यांनी सुरक्षा दलांवर होणाऱ्या हल्ल्यांमागील योजना उघड केल्या. तसेच, 2021 मध्ये विजापूरमध्ये झालेल्या चकमकीनंतर माओवाद्यांनी पकडलेल्या सीआरपीएफ जवानांच्या सुटकेमध्ये मुकेश चंद्राकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीआरपीएफ कमांडो राकेश्वर सिंग मन्हास याच्या सुटकेसाठी राज्य पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल त्यांना श्रेय दिले होते. मुकेशने नक्षलवादी हल्ले, चकमकी आणि बस्तर प्रभावित करणाऱ्या इतर मुद्द्यांवर विस्तृतपणे वार्तांकन केले आहे.