बिल गेट्स मोदी भेट : आरोग्य आणि विकास क्षेत्रातील भारताच्या वाढीबद्दल मी पूर्वीपेक्षा जास्त सकारात्मक

नवी दिल्ली : अमेरिकेचे उद्योगपती बिल गेट्स यांनी शुक्रवारी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी आरोग्य, हवामान बदल, G-20 अध्यक्षपदासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीबद्दल त्यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉग ‘गेट्सनोट्स’मध्ये लिहिले आणि भारताचे कौतुक केले.

ज्या वेळी जग अनेक आव्हानांनी वेढलेले आहे, अशा वेळी मी भारतासारख्या गतिमान आणि सर्जनशील ठिकाणी असणे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी लिहिले. या आठवड्यात भारतात असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन उपक्रमात गुंतवणूक करते तेव्हा काय शक्य आहे हे भारत जगाला दाखवत आहे. आरोग्य, विकास आणि हवामान बदल क्षेत्रातील भारताच्या वाढीबद्दल मी नेहमीपेक्षा यावेळी अधिक सकारात्मक आहे. मला आशा आहे की भारत ही वाढ अशीच सुरू ठेवेल आणि जगासोबत आपल्या नवीन कल्पना शेअर करत राहतील, असेही ते म्हणाले.

बिल गेट्स यांनी भारतीय कोरोना लस आणि आरोग्य सेवा प्रणालीचे कौतुक करताना म्हटले की, प्रभावी, सुरक्षित आणि परवडणारी कोरोना लस बनवण्याची भारताची अद्भुत क्षमता प्रशंसनीय आहे. या लसींमुळे लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि इतर आजारांना जगभरात पसरण्यापासून रोखले आहे. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की, गेट्स फाऊंडेशन देखील काही लसी बनवण्यासाठी भारताला सहकार्य करू शकले.

भारताने केवळ जीवनरक्षक लसीच बनवल्या नाही तर त्या जगभरात पोहचवण्याते मोठे काम केले आहे. भारताच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने Co-WIN वेबसाईटद्वारे कोरोना लसीचे २२० कोटी डोस वितरीत केले. या प्लॅटफॉर्मद्वारे करोडो लोकांनी लसीकरणाठी नोंदणी केली आणि लसीकरणानंतर सरकारकडून त्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले. Co-WIN हे जगासाठी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मत आहे आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे.

डिजिटल पेमेंटद्वारे 30 कोटी लोकांना आपत्कालीन पैसे मिळाले
महामारीच्या काळात भारताने डिजिटल पेमेंटचा अवलंब केल्यामुळे ३० कोटी लोकांना आपत्कालीन डिजिटल पेमेंट मिळाले. यामध्ये २०० दशलक्ष महिलांचाही समावेश आहे. भारताने आर्थिक समावेशाला आपले प्राधान्य देत डिजिटल आयडी प्रणाली (आधार) आणि डिजिटल बँकींगसारख्या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केल्यामुळेच भारताला हे शक्य झाले. यावरून हे सिद्ध झाले की, आर्थिक समावेशन ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगले काम
गतीशक्ती कार्यक्रम हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकार कसे चांगले काम करू शकते याचे उत्तम उदाहरण आहे, असे बिल गेट्स यांनी लिहिले. गती शक्तीमुळे रेल्वे आणि रस्त्यासह 16 मंत्रालयांना डिजिटली जोडले गेले. त्यामुळे ही मंत्रालये एकाच वेळी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी त्यांच्या योजना पूर्ण करू शकतील आणि भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते यांचे काम वेगाने पुढे जाण्यास मदत होणार आहे.

भारताच्या नवीन कल्पना देशाला मदत करत आहेत
G20 अध्यक्षपद ही देशातील नवीन कल्पना जगाला कशी मदत करू शकते हे अधोरेखित करण्याची एक उत्तम संधी भारताकडे आहे. भारताच्या या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांना मदत करणे, विशेषत: भारताची डिजिटल आयडी आणि पेमेंट प्रणाली इतर देशांमध्ये नेणे, हे गेट्स फाऊंडेशनच्या प्राधान्यांपैकी एक आहे, असेही, बिल गेट्स म्हणाले.