घरदेश-विदेशमल्लिकार्जुन खर्गेंच्या वक्तव्यावरून राज्यसभेत भाजपा आक्रमक, माफीची मागणी

मल्लिकार्जुन खर्गेंच्या वक्तव्यावरून राज्यसभेत भाजपा आक्रमक, माफीची मागणी

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजस्थानमध्ये केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून भाजपाने राज्यसभेत काँग्रेसला घेरले. त्यांनी खर्गे यांच्या माफीची मागणी केली. तर, मल्लिकार्जुन खर्गे मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले.

राजस्थानच्या अलवर येथे सोमवारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या भाषणात अपशब्दांचा वापर केला होता. हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी जे प्रकारे अपशब्द वापरले, निराधार गोष्टी सांगितल्या आणि देशासमोर असत्य मांडण्याचा प्रयत्न केला… त्याचा मी निषेध करतो आणि त्यांनी याबद्दल माफी मागावी, अशी मी मागणी करतो, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले. पूर्ण बहुमत मिळवत हे भाजपाने हे सरकार स्थापन केले असल्याने खर्गे यांनी भाजपा, संसद तसेच या देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे. खर्गे यांनी आपल्या मानसिकतेची आणि मत्सराची झलक दाखवली आहे, असेही पीयूष गोयल म्हणाले.

- Advertisement -

संसदेबाहेर भाजपाची खर्गेंवर टीका
भाजपाने सभागृहाबाहेर सुद्धा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. काँग्रेस इतक्या खालच्या थराला जाईल, असा विचारही केला नव्हता. स्वातंत्र्यसंग्रामात सर्व देश बलिदान द्यायला तयार होता. ती लोक पक्ष म्हणून काम करत नव्हते, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारची भाषा वापरली, ती ऐकायला अयोग्य आहे. त्याचा निषेध करणेही मला उचित वाटत नाही. आम्ही शत्रू नाही, प्रतिस्पर्धी आहोत, हे ध्यानी घेतले पाहिजे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्या अपशब्दांचा वापर केला, त्यामुळे राजकारणाचा स्तर घसरत आहे, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले.

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे ठाम
भाजपाकडून संसद आणि संसदेबाहेर टीका केली जात असताना देखील मल्लिकार्जुन खर्गे मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी जे बोललो ते सभागृहाबाहेर होते. त्याची येथे चर्चा करण्याची गरज नाही. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका नव्हती, असे मी अजूनही म्हणू शकतो. हे लोक ‘माफी मागणारे लोक’ आहेत, असे खर्गे म्हणाले. मी बाहेर जे बोललो ते पुन्हा सांगितले तर, त्यांच्यासाठी अवघड होईल. माफी मागणारे लोक स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांकडे माफीची मागणी करत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी बलिदान दिले. तुमच्यापैकी कोणी या देशाच्या एकात्मतेसाठी आपले प्राण दिले? असा सवाल त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -