Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, भूपेंद्र पटेल होणार मुख्यमंत्री

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, भूपेंद्र पटेल होणार मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल आता गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार असून याबाबत औपचारिक घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार

Related Story

- Advertisement -

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाणी पदावरुन पायउतार झाल्यावर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यामध्ये अनेक नावांची चर्चा सुरु होती. परंतु घाटलोदियाचे प्रतिनिधीत्व करणारे भूपेंद्र पटेल यांच्या नावावर भाजपच्या बैठकीत एकमत झालं आहे. भूपेंद्र पटेल आता गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार असून याबाबत औपचारिक घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे. भाजपच्या सर्व आमदार आणि केंद्रिय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर सर्वांनुमते पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून गुजरातला आता नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. यावेळी गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि केंद्रिय मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अमदाबाद महानगरपालिकामध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष राहिले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये अनेक नावे होती. काही नावे ही प्रबळ दावेदार होती परंतु भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झालं असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. पटेल हे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे मानले जातात. आनंदीबेन यांच्या राजीनाम्यानंतर विजय रुपाणींना मुख्यमंत्री करण्यात आले होते.

पटेल समाजाचा मंत्री का?

- Advertisement -

गुजरातमध्ये पुढील वर्षी महानगरपालिका निवडणुका येत आहे. या निवडणुकांमध्ये पटेल समाजाला आणि पाटीदार समाजाल भाजपकडे वळवण्यासाठी पटेल समाजाचा मुख्यमंत्री करण्यात आला असल्याची चर्चा सुरु आहे. भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे नेते आहेत. गुजरातमध्ये काही बड्या महानगरपालिका आहेत या पालिकांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपकडून फेरबदल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे बडे नेते अमित शाह यांच्या जवळचे असणाऱ्या विजय रुपाणींना राजीनामा द्यावा लागल्यामुळे भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

राजीनामा दिल्यावर रुपाणी काय म्हणाले?

गुजरात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे की, मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली असून भविष्यात जी जबाबदारी देण्यात येईल ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपच्या नेतृत्वाचे आभार व्यक्त करत भविष्यात जी जबाबदारी दिली जाईल त्याचे पालन करुन केंद्रीय नेतृत्व आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली नव्या ऊर्जेसह काम करत राहील असे विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -