‘राफेल प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी CBI संचालकांवर कारवाई’

राफेल करारावरून लक्ष्य विचलित करण्यासाठी भाजपनं सीबीआयच्या संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi says C P Joshi statement is against the ideals of Congress
काँग्रेस खासदार राहुल गांधी

CBI संचालकांना सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राफेल कराराच्या मुद्यावरून लक्ष्य हटवण्यासाठी सरकारनं सीबीआयच्या संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आजच कॅबिनेटनं सीबीआयचे संचालक आणि उपसंचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यानंतर संचालक अलोक वर्मा यांच्या जागी नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, यानंतर संचालक अलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. शिवाय, प्रशांत भूषण यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वाचा – सीबीआयच्या विशेष संचालकांवर लाच घेण्याचा आरोप

काय आहे प्रकरण?

देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआय अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा ठपका लागला आहे. सीबीआयने आपलेच विशेष संचालक आणि क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाला क्रमांक एक आणि क्रमांक दोनचे अधिकारी असा वाद असल्याचेही बोलले जात आहे. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातील वाद या प्रकरणाला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. सीबीआयने अस्थाना यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये अस्थाना यांनी मांस व्यापारी मोईन कुरेशीकडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अस्थाना हेच कुरेशींविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत होते.

 CBIच्या कार्यालयावर छापे

सीबीआयने आज, बुधवारी तीन दिवसांत त्यांच्याच मुख्यालयावर दुसऱ्यांदा छापा मारला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय मुख्यालयातील १० वा आणि ११ वा मजला सील करण्यात आला आहे. आज पहाटेपासूनच या दोन्ही मजल्यांवरील कार्यालयांची झाडाझडती सुरू आहे. सध्या सीबीआयच्या अंतर्गत वादाची चर्चा देशभर सुरु असताना सलग तीन दिवस सीबीआयची कारवाई सुरु आहे.

वाचा – CBI ने स्वतःच्याच मुख्यालयात टाकले छापे