BJP Leader JP Nadda targeted to Rahul Gandhi | नवी दिल्ली – “काँग्रेस पक्ष देशविरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे हे दुर्दैवी आहे. राहुल गांधी आता देशविरोधी टुलकीटचा (Anti National Toolkit) कायमचा भाग बनले आहेत. देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असताना आणि जी-20 बैठक भारतात होत असताना राहुल गांधी परदेशात देशाचा आणि संसदेचा अपमान करत आहेत,” भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार निशाणा साधला आहे.
जेपी नड्डा म्हणाले की, राहुल गांधी 130 कोटी जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा अपमान करत आहेत. यातून देशद्रोह्यांना बळ मिळत नसेल तर काय? राहुल गांधी परदेशात जाऊन म्हणतात की भारतात लोकशाही संपली असून युरोप आणि अमेरिकेने हस्तक्षेप करावा. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. राहुल गांधी जेव्हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये इतर देशांकडून हस्तक्षेप करण्याची मागणी करतात, तेव्हा तुमचा हेतू काय आहे?, असा प्रश्नही जे.पी.नड्डांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी जे.पी.नड्डा यांनी केली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि सर्वात मोठ्या संकटाच्या काळातही कोणत्याही भारतीय नेत्याने परकीय शक्तींकडून भारत सरकारवर कारवाईची मागणी केलेली नव्हती. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात गंभीर बाब आहे.
हेही वाचा – ते तुमची खिल्ली उडवतील; जयराम रमेश यांनी राहुल गांधींना दिला सल्ला, का ते वाचा
जेपी नड्डा म्हणाले की, जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी एकच भाषा का बोलतात? पाकिस्तान आणि काँग्रेस एकच का बोलतात? इटलीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींना सर्वात गोंडस पंतप्रधान म्हटले आहे. जागतिक बँकेपासून ते आयएमएफपर्यंत सर्वजण भारताच्या विकासाचे कौतुक करत आहेत. भारताचा विकास अतुलनीय असल्याचे जर्मन चॅन्सेलर म्हणाले. ऑस्ट्रेलिया, यूएई आणि सौदी अरेबिया देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करत आहेत. पण राहुल गांधी देशाचा अपमान करत आहेत.
जेपी नड्डा म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी आहे. भारताच्या लोकशाही परंपरेला हानी पोहोचवणारी जगातील कोणतीही शक्ती नाही. आज देशात तुमच्या पक्षाचे कोणी ऐकत नाही, जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही. यामुळेच तुमचा पक्ष जवळपास नेस्तनाबूत झाला आहे.