नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारीला साजरी करण्यात आली. राज्यातच नाही तर देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साह दिसून आला. मध्य प्रदेशातील इंदूर येथे मराठी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. (BJP leader Kailash Vijayvargiya statement on Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary is in the news)
इंदूरच्या नेहरू स्टेडियममधील शिवाजी पुतळ्याच्या पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या लोकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, मुघलांचा दहशतवाद कोणापासूनही लपलेला नाही. मुघलांनी देशाच्या अनेक भागांवर आक्रमण केले आणि हिंदू कुटुंबांवर अनेक अत्याचार केले, परंतु मुघलांना छत्रपती शिवाजी महाराजांमुळे माळवा आणि त्याच्या आसपासच्या भागात प्रवेशही करता आला नाही. त्यामुळे आज हिंदू धर्म अबाधित आहे. त्यामुळे माझे नाव कैलाश आहे. नाहीतर माझे नावही कैलाशऐवजी कलीमुद्दीन झाले असते.
हेही वाचा – Politics : दोन दिवसांपूर्वी अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश, आता ब्लॅकमेलिंगचा आरोप करत घरवापसी
कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, माळवा प्रदेश मराठा शासकांनी संरक्षित केला होता. त्यांच्या धाडसामुळे आणि संघर्षामुळेच भारताच्या अनेक भागात मुघलांचा हस्तक्षेप थांबवता आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्माची रक्षा करण्यासाठी सेना उभी केली. त्यांच्या मुठभर सैनिकांनी लाखोंच्या सेनेला पराभूत केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सनातन धर्माची रक्षा केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर ब्रिटिश भारतात आले. महाराज असताना ब्रिटिशांनाही इथे येता आले नसते. त्यामुळे हिंदू समाज शिवाजी महाराजांचा कृतज्ञ आहे.
कैलाश विजयवर्गीय यांच्याविषयी
कैलाश विजयवर्गीय हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. ते मध्यप्रदेशसह बाहेरच्या राज्यांमध्येही प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगालमध्ये बराच काळ ते भाजपाचे प्रभारी होते. नगरपालिका नगरसेवक पदापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज ते राष्ट्रीय सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख दावेदार कैलाश विजयवर्गीय असतील, असे मानले जाते. त्यांचा इंदूरमध्ये बराच प्रभाव असून ते वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी एका निवेदनात म्हटले होते की, शारीरिक वजन कमी होऊ शकते पण राजकीय वजन कमी होऊ नये.
हेही वाचा – Delhi CM : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची सासू म्हणते, माझी झोळी आता…