
काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यावरून आता काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करत आहे. याच दरम्यान, कलाविश्वातून राजकारणात आलेल्या खुशबू सुंदर यांचे 2018 मधील एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी हे ट्विट 2018 मध्ये काँग्रेस पक्षात असताना केले होते. सध्या खुशबू भाजपमध्ये असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आहेत.
काँग्रेसमध्ये असताना खुशबू सुंदर यांनीही मोदींच्या आडनावावर प्रश्न उपस्थित केले होते. 2018 मध्ये केलेल्या ट्विटमध्ये खुशबू सुंदर यांनी राहुल गांधींप्रमाणे मोदी आडनावावरही प्रश्न उपस्थित केले होते.
खुशबू सुंदर यांचे ट्वीट काय?
खुशबू सुंदर यांनी ट्वीट केले होते की, इकडे मोदी तिकडे मोदी, जिकडे दिसतात मोदी, पण हे काय? प्रत्येक मोदी आडनावासमोर एक भ्रष्टाचारी नाव असते… #मोदी म्हणजे #भ्रष्टाचार… चला मोदी आडनावाचा अर्थ भ्रष्टाचार असा करुया. हे अधिक योग्य..#नीरव#नमो=करप्शन…”
काँग्रेसचे नेते द्विग्वीजय सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत आणि गुजरातचे आमदार पूर्णेश मोदी आता भाजपमध्ये असलेले आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य असलेल्या खुशबू सुंदर यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न विचारला आहे.
विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांची सदस्यता काढून घेण्यामागे राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे. सुरतच्या न्यायालयाने गुरुवारी (23 मार्च) राहुल गांधींना मोदी आडनावाच्या टिप्पणीसाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि शुक्रवारी (24 मार्च) राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी या निर्णयाचा राजकीय सूड म्हणून निषेध केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
मोदी जी @narendramodi क्या आप @khushsundar पर भी मान हानि का मुक़दमा मोदी नाम वाले अपने किसी शिष्य से दायर करवाएँगे? अब तो वे @BJP4India की सदस्य हैं। देखते हैं। धन्यवाद @zoo_bear @INCIndia @RahulGandhi https://t.co/qIibuycY6n
— digvijaya singh (@digvijaya_28) March 25, 2023
( हेही वाचा: माफी मागायला मी सावरकर नाही, राहुल गांधींचा पुन्हा निशाणा )
राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. तर, काॅंग्रेस सुरत न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
खुशबू सुंदर यांनी त्यांच्या जुन्या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि ते ट्वीटही डिलीट केलेले नाही. राहुल गांधी यांच्या लोकसभेतून करण्यात आलेल्या निलंबनावर भाजप नेते अनुराग ठाकून म्हणाले की, राहूल गांधी म्हणाले होते की, ते दुर्दैवाने खासदार आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी गेल्याने आता ते मुक्त झाले आहेत.