Viral video : त्रिपुरातील भाजप आमदाराला मोह आवरेना; विधिमंडळात बघितला पॉर्न

त्रिपुराः त्रिपुरामधील भाजपचे आमदार जादब लाल नाथ हे विधिमंडळात बसून चक्क पॉर्न बघत असल्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना आमदार नाथ हे पॉर्न बघत होते. त्यामुळे नाथ यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.

नाथ यांचा हा व्हिडिओ ३० मार्चचा आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. नाथ हे बागबासा विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. या विधानसभा क्षेत्रात सीपीएमचा बोलबाला होता. २०१८ मध्ये येथे सीपीएमच्या बिजिता नाथ यांनी भाजपच्या प्रदीप कुमार नाथ यांना पराभूत केले होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जादब लाल नाथ यांनी सीपीएमच्या बिजिता नाथ यांना पराभूत केले.

२०२३ च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने 32 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर टिप्रा मोथा पार्टी 13 जागा जिंकून दुसर्‍या क्रमांकावर होती. त्याचवेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला (मार्क्सवादी) 11 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या. माणिक साहा यांनी त्रिपुराची राजधानी अगरताला येथील स्वामी विवेकानंद मैदानावर सलग दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

साहा यांच्यासोबत रतनलाल नाथ, प्रांजित सिंघ रॉय, प्रांजित सिंघ रॉय आणि सुशांत चौधरी यांनी देखील मुख्यमंत्री माणिक साहाच्या शपथविधी समारंभात अगरताला येथे त्रिपुराचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. रतनलाल नाथ हे मोहनपूरचे आमदार असून ते आधी बिपलाव्ह देव यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. सुशांत चौधरी हे मजलिशपूर असेंब्लीचे आमदार आहेत. तसेच, पॅन्चरथल असेंब्लीचे आमदार सान्ताना चकमा यांनी देखील शपथ घेतली आहे. या व्यतिरिक्त, टिंकू रॉय यांनी देखील शपथ घेतली आहे.

साहा यांचा कार्यकाळ नुकताच सुरु झाला आहे. त्यात नाथ यांचा पॉर्न बघतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने साहा सरकारवरही नामुष्की ओढवली आहे. या व्हिडिओबाबत सत्ताधाऱ्यांपैकी कोणी अद्याप भाष्य केलेले नाही. विरोधकांनी यामुळे साहा सरकारवर निशाणा साधला आहे.