आधी हात जोडून माफी मागा तरच अयोध्यात प्रवेश, राज ठाकरेंना भाजप खासदाराचा इशारा

राज ठाकरे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही या खासदाराने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. तसेच राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. तर उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर काढण्याची भूमिका घेतल्याने राज यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नुकतेच कौतुक केले आहे. मात्र, आता उत्तर प्रदेशातील एका भाजप खासदाराने राज ठाकरेंविरोधात भूमिका घेतली आहे.

कैसरगंज येथील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी आधी हात हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, तरच त्यांना प्रवेश दिला जाईल, असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. तर राज ठाकरे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही या खासदाराने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. तसेच राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते  पूर्ण एक दिवस अयोध्येत असणार आहेत. यावेळी राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी ट्विट करत राज ठाकरेंवर टिका केली. राज ठाकरे उत्तर भारतीयांचा अपमान करत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सिंह यांनी केली आहे. जोपर्यंत ते हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊन देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. राम मंदिर आंदोलन ते मंदिर उभारणी यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे खासदार सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.