घरदेश-विदेशभाजपच्या आणखी एका खासदाराचे राजीनामा अस्त्र

भाजपच्या आणखी एका खासदाराचे राजीनामा अस्त्र

Subscribe

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे उत्तर मुंबई मतदारसंघाचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आता स्वपक्षीय नेत्यांविरोधातच दंड थोपटले आहेत. जर माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार असाल तर मी राजीनामा देतो, असा इशाराच शेट्टी यांनी भाजपला दिला आहे. भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकवत राजीनामा दिला होता. गोपाळ शेट्टीही त्याच मार्गावर जाणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.

गोपाळ शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी मालाड येथील एका कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. “भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चन समाजाचे भारतासाठी कोणतेही योगदान नव्हते”, असा दावा त्यांनी केला होता. शेट्टींच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सदर वक्तव्य शेट्टी यांचे वैयक्तिक मत असल्याचे शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

पक्षनेतृत्वाने फटकारल्यानंतर सुरुवातील शेट्टी यांनी थोडीशी मवाळ भूमिक घेतली. सबका साथ, सबका विकास.. ही आमच्या पक्षाची विचारधारा असून सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला जायचे आहे, असे ते म्हणाले. पण आज पुन्हा त्यांनी आपली भूमिका बदलत मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे सांगितले. मला माझ्या पदापेक्षा अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असल्याचे शेट्टी यांनी ठणकावले आहे. वेळप्रसंगी मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असेही ते म्हणाले. लवकरच ते राजीनाम्याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत.

याआधीही बेताल वक्तव्याबाबत चर्चेत

खासदार गोपाळ शेट्टी यांनी याआधी असेच बेताल वक्तव्ये केलेली आहेत. शेतकरी आत्महत्या करण्याची आता फॅशन झाली असल्याचे ते म्हणाले होते. त्या वक्तव्यावरही बराच गजहब झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -