पीएम मोदी आजच्या युगातील कृष्ण भगवान, भाजपच्या महिला खासदारांनी भगवान श्रीकृष्णाशी केली मोदींची तुलना

दिल्लीमध्ये आज राज्यसभेत आदिवासी मंत्रालयाशी संबंधित एका विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजपच्या महिला खासदारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबोबत एक मोठं विधान केलं आहे. तसेच त्यांनी थेट भगवान श्रीकृष्णशी मोदींची तुलना केली आहे. पीएम मोदी आजच्या युगातील कृष्ण भगवान, अशा प्रकारचं विधान भाजपच्या महिला खासदार संपतिया उईके यांनी केलं आहे.

राज्यघटना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ) आदेश विधेयक २०२२ यावरील चर्चेत बोलताना खासदारांनी मोदींची तुलना भगवान श्रीकृष्णाशी केली आहे. देशात असे अनेक पंतप्रधान झाले आहेत. ज्यांनी देशाच्या कल्याणासाठी काम केलं. पण ते फक्त भारतापुरतेच मर्यादित राहीले आहेत. परंतु मोदींकडे अप्रतिम इच्छाशक्ती आणि राष्ट्र व जगाच्या कल्याणाची भावना आहे, त्यामुळेच त्यांना आज जागतिक नेता म्हणून संबोधलं जात आहे, असं उईके म्हणाल्या.

उईके यांनी हे विधान केल्यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दोनवेळा खासदारांना विधेयकावर बोलण्याचा सल्ला दिला. तसेच फक्त या विधेयकावर चर्चा करावी आणि आपलं भाषण संपवावं, अशी सूचना उपसभापतींकडून करण्यात आली.

अमेरिका, रशिया असो किंवा मग शेजारील देश पाकिस्तान असो. आज पीएम मोदींची सर्वजण स्तुती करत आहेत. मोदी सध्याच्या युगातील कृष्ण भगवान आहेत. त्यांच्याकडेही १६ कला आहेत, असं विधान खासदार संपतिया उईके यांनी केलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास असं म्हणत या आवाहनाची तुलना प्राचीन भारतीय सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी केली आहे.


हेही वाचा : video viral : तर हिंदुस्तानचा थांगपत्ताच लागणार नाही..,कव्वालीचं भाजप आमदारासमोर मोठं वक्तव्य