Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाले..

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाले..

Subscribe

मोदी यांच्या आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरतच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावरून आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून बदनामीकारक वक्तव्ये करणे हे राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु, लगेचच त्यांचा 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजुर करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता देशातील राजकारण चांगलेच तापले असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या जुन्या आरोपांबद्दल बोलताना जे. पी. नड्डा म्हणाले की, प्रत्येक वेळी राहुल गांधी यांचा त्यांनी स्वतः केलेल्या वक्तव्यावर पराभव झाला आहे. एवढेच नाही तर त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचेही यावेळी नड्डा म्हणाले.

यावेळी बोलताना जे. पी. नड्डा म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तथ्यांपलीकडे खोटे आरोप करण्याची सवय आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल यांनी राफेलच्या नावावर देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. बनावट आरोपासाठी बिनशर्त माफी मागण्यासाठी देखील त्यावेळी कोर्टाकडून सांगण्यात आले होते.

- Advertisement -

तर ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा संदर्भ देत नड्डा म्हणाले की, राहुल यांनी स्वतःच केलेल्या वक्तव्यावर गोंधळ घातला. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. या घोषणेवर न्यायालयाने देखील राहुल गांधींना जोरदार फटकारले होते आणि त्यानंतर काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा पुढे म्हणाले की, राहुल गांधींचा उद्दामपणा आणि अहंकार वाढला आहे आणि त्यांची समज खूप लहान आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. या समाजाला त्यांनी चोर म्हंटले. समाज व न्यायालयाकडून वारंवार समजावून सांगून माफी मागण्याच्या पर्यायाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले आणि सातत्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या. तर, काल सुरत न्यायालयाने राहुल यांना ओबीसी समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिक्षा सुनावली आहे. पण राहुल आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या उद्दामपणामुळे अजूनही त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि सतत ओबीसी समाजाच्या भावना दुखावत आहेत. राहुल यांच्या या अपमानाचा संपूर्ण ओबीसी समाज लोकशाही पद्धतीने बदला घेईल, अशी टीकाही जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.


- Advertisement -

हेही वाचा – Breaking News : राहुल गांधींची खासदारकी रद्द; मोदी आडनावाचे प्रकरण भोवले

- Advertisment -