Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबईतल्या नालेसफाईची पोलखोल ; कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या खिशात

मुंबईतल्या नालेसफाईची पोलखोल ; कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या खिशात

Related Story

- Advertisement -

पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची तुंबई झाली. रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक कुर्ला ते सीएसएमटी, वाशी दरम्यान ठप्प झाली. नागरिकांचे खूप हाल झाले. मिठी व इतर नद्या, नाले तुडुंब झाले. हिंदमाता, किंग्जसर्कल आदी नेहमीच्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व पावसानंतर अशा तीन टप्प्यात नालेसफाईची कामे करते. त्यासाठी दरवर्षी अंदाजे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र तरीही दरवर्षी मुंबईत थोडासा जास्त पाऊस पडला की, हिंदमाता, किंग्जसर्कल, सायन, वडाळा, घाटकोपर , अंधेरी सब वे आदी सखल भागात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे रस्त्यावरील बेस्ट बस, खासगी वाहने यांची वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागते. त्यामुळे प्रवासी, नागरिकांचेही हाल होतात. त्यामुळे दरवर्षी एवढे कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना जर पावसाळ्यात दिलसा मिळत नसेल तर हा पैसा जातो कोणाच्या खिशात, असा संतप्त सवाल विरोधक असलेल्या भाजप नेत्यांकडून आणि मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

पालिका प्रशासन व महापौर किशोरी पेडणेकर यांनी, यंदा नालेसफाईची कामे १०४% झाल्याचा दावा केला होता. मात्र अवघ्या काही तासातच मुंबईत अतिवृष्टी झाली आणि हा दावा साचलेल्या पाण्याबरोबर वाहत वाहत समुद्राला मिळाला.
संपूर्ण वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून तीन टप्प्यात सुमारे ४ लाख १३ हजार मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित असते. पालिकेने कंत्राटदारांनामार्फत यंदाच्या पावसाळापूर्व कामाअंतर्गत ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित केले असताना प्रत्यक्षात ३१ मे अखेरीसपर्यंत एकूण ३ लाख २४ हजार २८४ इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे. यामध्ये, शहर भागात ४३ हजार ७६६ मेट्रिक टन, पूर्व उपनगरात १ लाख ६ हजार २६० मेट्रिक टन, पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ८२ हजार २८५ मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात आला असून एकूण ११ हजार ४ इतक्या वाहनफेऱया करुन १०४% गाळ वाहून नेण्यात आला आहे, असा दावा महापौरांनी कालच केला होता.
मात्र कॉंग्रेस नेते व मुंबई अध्यक्ष भाई गिरकर यांनी धारावी, घाटकोपर आदी परिसरातील पाहणीत नाले तुंबल्याचा आरोप केला होता. तर भाजपचे नेते आशिष शेलार आणि पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही नालेसफाई कामांची
पाहणी करून अद्यापही धारावी विभागतील नाला तुंबलेला असल्याचा व पालिकेचा नालेसफाईबाबतचा दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे.

जर पालिकेने नालेसफाईची कामे केली आहेत तर मग नाल्याममधील गाळ कुठे टाकण्यात आला, गाळाची वाहतूक कशी करण्यात आली, वजन कुठे, कधी व कोणी केले, या गाळ वाहतुकीचे पुरावे काय आहेत, याचा जवाब हा काँग्रेस, भाजपसह मुंबईकर मागत आहेत.

- Advertisement -

त्यामुळे या नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. जर नालफसफाई कामांची चौकशी झाल्यास कंत्राटदार व पालिका अधिकारी यांचे नालेसफाईच्या कामात संगनमत होते की नाही, नेमकी नालेसफाई झाली का, किती प्रमाणात झाली, गाळ कुठे टाकला, त्याचे पुरावे काय याबाबतची पोलखोल होणार आहे. दरवर्षी जर नालेसफाई कामावर कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई होणार असेल तर हवी कशाला नालेसफाई असा संतप्त सवाल उद्या मुंबईकरांनी उपस्थित केला तर पालिका प्रशासन ,कंत्राटदार आणि सत्ताधारी याची अडचंण वाढणार आहे, हे निश्चित.


 

- Advertisement -