राज ठाकरेंना भाजपचे मौन समर्थन तरीही बृजभूषण शरण सिंह यांचा विरोध का?

भाजपकडून राजला पाठींबा मिळत असताना बृजभूषण यांच्या या विरोधामागे नक्की राजकारण काय हे समजायला हवं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. याचपार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्तेही अयोध्यावारीच्या तयारीला लागले आहेत. राज यांच्या या हिंदुत्ववादी भूमिकेला भाजपचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे. मात्र असे असतानाही उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मात्र राज यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत राज उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर पाऊल टाकू न देण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे भाजपकडून राजला पाठींबा मिळत असताना बृजभूषण यांच्या या विरोधामागे नक्की राजकारण काय हे समजायला हवं.

गुढी पाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मशिदीवरील भोंग्याला विरोध दर्शवत जशास तसे वागण्याचे आदेशच मनसैनिकांना दिले. मशिदीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे फर्मानच त्यांनी सोडले. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणारे राज भाजपला जसे जवळचे वाटू लागले तसेच ते उत्तर भारतीयांनाही वाटू लागले. त्यातच राज यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये राज यांच्या स्वागताचे पोस्टर्स झळकले. मुंबई आणि महाराष्ट्रात परप्रांतियांविरोधात विशेषत उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे यांच्यातील हा बदल सगळ्यांच्याच लक्षात आला. तसेच राज यांना उत्तर भारतीयांचे मिळणारे समर्थन बघून मुंबई भाजप आणि युपीतील भाजप नेते मात्र अस्वस्थ झाले. आपला मतदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज यांच्याकडे वळतोय हे बघून या नेत्यांना असुरक्षित वाटू लागले आहे. यातूनच मग कैसरगंज येथील खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांना उत्तर भारतीयांची माफी मागा तरच प्रवेश देण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज ठाकरे दबंग नाही तर उंदरासारखे बिळात राहतात. पण असे बोलताना बृजभूषण यांनी मराठ्यांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनही करत आहेत.

यामुळे बृजभूषण यांचा राग राज ठाकरेंवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंच्या विरोधात अधिकाधिक उत्तर भारतीयांना एकत्रित आणण्याचा बृजभूषण यांचा प्रयत्न असून काही स्थानिक उत्तर भारतीय संघटनाही बृजभूषण यांच्या समर्थनार्थ एकवटल्या आहेत. यामुळे येत्या काही दिवसात यावर राज ठाकरे कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.