नवी दिल्ली : 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देशभरातील अनेक हिंदू येतील. परंतु, त्यानंतर हा समारंभ संपल्यानंतर गोधरा हत्याकांडासारखी घटना घडू शकते, असे विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. रविवारी जळगावमध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आले होते. परंतु, त्यांनी केलेल्या या विधानाचा भाजपच्या मंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेली ही आघाडी मतांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असे भाजपचे नेते रवीशंकर प्रसादत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या विधानावर निशाणा साधला आहे. (BJP targeted Uddhav Thackeray’s statement regarding the inauguration of Ram Mandir)
हेही वाचा – Mamata Banerjee : आमचा भारत नावावर आक्षेप नाही, पण…; ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा
उद्धव ठाकरे यांच्या विधानावर टीका करताना रवीशंकर प्रसाद म्हणाले की, प्रभू राम यांना काही बुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो. कारण त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे लज्जास्पद आणि अशोभनीय टिप्पणी आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, असे रवीशंकर प्रसाद यांच्याकडून सांगण्यात आले. तर अनुराग ठाकूर यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या विधानाचा निषेध केला आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर याबाबत बोलताना म्हटले आहे की, बाळासाहेब यांनी आज काय विचार केला असेल आणि सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे आज काय करत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी काही लोक आपली विचारसरणी विसरले आहेत. सनातन धर्माबाबत इतक्या गोष्टी बोलल्या जात असताना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत काहीही बोलण्यात आलेले नाही.
27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून साबरमती एक्स्प्रेसने परतणाऱ्या कारसेवकांवर गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर हल्ला करण्यात आला होता. ज्या रेल्वे डब्यात कारसेवक प्रवास करत होते त्या डब्याला आग लागली. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. त्यामुळे या घटनेचा उल्लेख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्याने भाजपच्या नेत्यांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.