(BJP Vs Congress) नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून वाद सुरू असतानाच भाजपाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक करत असतानाच, दुसरीकडे राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले असल्याची टीका भाजपाने केली आहे. शिवाय, मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलशाच्या विसर्जनाला काँग्रेस आणि गांधी घराण्यातील कोणीही नसल्याची टीका यापूर्वी भाजपाने केली होती. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. (Criticism of BJP over Rahul Gandhi’s foreign visit)
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी इन्स्टाग्रामवर राहुल गांधी यांच्यावर टीका करणारी पोस्ट शेअर केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला जात आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूवरून राहुल गांधी राजकारण करत असल्याचा आरोपही मालवीय यांनी केला आहे. गांधी परिवार आणि काँग्रेस शीखांचा द्वेष करतात. इंदिरा गांधी यांनी दरबार साहिबचा अपमान केला होता, हे विसरू नका, असेही त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा – SS UBT Vs NDA Govt : हिंदुस्थान हा मोदी-शहा सरकारच्या बापजाद्यांची कमाई नाही, ठाकरे गटाचा संताप
काँग्रेसनेही भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे खासगी दौऱ्यानिमित्त परदेशात गेले असून त्यामुळे कोणालाही अडचण येऊ नये. हा एखाद्याचा वैयक्तिक मुद्दा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. हा पक्ष फोडाफोडीचे राजकारण कधी सोडणार? असा प्रश्न करून काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांना यमुनेच्या काठावर अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे नकार दिला आणि त्यांच्या मंत्र्यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाला ज्या प्रकारे घेरले, ते लज्जास्पद आहे. राहुल गांधी वैयक्तिक स्तरावर दौरा करत असतील तर यांना त्रास का होत आहे? नवीन वर्षात तरी सुधरा, असे मणिकम टागोर यांनी भाजपाला सुनावले आहे.
यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलशाच्या विसर्जनाला काँग्रेस नेते उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपाने प्रश्न उपस्थित केले होते. कुटुंबाच्या व्यक्तिगत भावनांचा आदर करून, पक्षाचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी कुटुंबासोबत गेला नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाची निवड आणि विसर्जन करण्यासाठी कुटुंबासोबत गेले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवंगत नेत्याच्या अंत्यसंस्कारानंतर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबाची भेट घेतली, असे काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी म्हटले आहे. (BJP Vs Congress: Criticism of BJP over Rahul Gandhi’s foreign visit)
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : काँग्रेसने अदानींकडे विनंती अर्ज करायला पाहिजे का? ठाकरे गटाचा खोचक प्रश्न