मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारणीची दोन दिवसीय बैठक पार पडत आहे. 1924 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे शताब्दी वर्ष म्हणून काँग्रेस पक्ष हे वर्ष साजरे करत आहे. या कार्यक्रमात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह पक्षातील अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत. मात्र, या बैठकीपूर्वी कर्नाटकातील बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण या बॅनर्सवर भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने छापण्यात आला आहे. यावरून भाजपने काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीवर टीकास्त्र सोडले आहे. (BJP vs Congress Wrong map of India displayed in CWC session PoK missing BJP said Congress is the new Muslim League)
नेमकं प्रकरण काय?
26 आणि 27 डिसेंबर, असे दोन दिवस कर्नाटकातील बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. आज या बैठकीचा पहिला दिवस आहे. या बैठकीसाठी आलेल्या नेतेमंडळींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यासाठी संबंधित परिसरात बॅनरबाजी करण्यात आली होती. पण या बॅनरबाजीत भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने छापल्याचे काँग्रेस विरोधी भाजपने अधोरेकित केले असून त्यांच्या टीकास्त्र सोडलं आहे. त्यानुसार, बेळगावी शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये भारताच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि अक्साई चीनचे क्षेत्र छापण्यात आलेले नाही. परिणामी त्या पोस्टर्सवरून काँग्रेसवर भाजपने टीका केली आहे. नवीन मुस्लिम लीग, अशा शब्दांत भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
या पोस्टर्सवरून भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “काँग्रेसची खरी मानसिकता दिसून येते. यामुळेच काँग्रेसने कलम 370 हटवण्याला पाठिंबा दिला नाही”, अशी टीका त्यांनी केली. शिवाय, भाजपच्या स्थानिक नगरसेविका श्रेया नाकाडी यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यानुसार, “भारताचा मुकुट हरवला आहे. आता हा महात्मा गांधींचा भारत नसून सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा भारत आहे. तसेच, “काँग्रेस आता नवीन मुस्लिम लीग बनली आहे. त्याला पुन्हा भारत तोडायचा आहे”, अशा शब्दांत भाजप नेते अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
दरम्यान, भाजपनं अधोरेकित केलेल्या या मुद्द्यावर काँग्रेसने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानुसार, काँग्रेसने या प्रकरणापासून दूर राहत हे काँग्रेसचे अधिकृत बॅनर नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – SS UBT Vs ECI : …हे सगळे लोकशाहीला मारक, ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर निशाणा