Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशBJP Vs Rahul Gandhi : पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत, बावनकुळेंचे मविआला प्रत्युत्तर

BJP Vs Rahul Gandhi : पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत, बावनकुळेंचे मविआला प्रत्युत्तर

Subscribe

राहुल गांधी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

(BJP Vs Rahul Gandhi) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल वादग्रस्त ठरला आहे. लोकसभेत भरघोस यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. अवघ्या पाच महिन्यांत 39 लाख नव्या मतदारांचा झालेली नोंदणी तसेच एकूण प्रौढांच्या तुलनेत मतदारांची संख्या जास्त असणे या मद्द्यावर भर देत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी, विरोधक अद्याप पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत, असे म्हटले आहे. (Bavankule’s reply to MVA regarding Maharashtra elections)

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्वीकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरंतर, निवडणूक आयोगाने यापूर्वीच मतदारवाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरे दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्याने नाकारले आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणे, हा निराशेचा कळस असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. (BJP Vs Rahul Gandhi : Bavankule’s reply to MVA regarding Maharashtra elections)

हेही वाचा – Fadnavis On Gandhi : ही तर आणखी एका फेक नरेटिव्हची तयारी, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस –