‘भारत जोडो’ नव्हे ‘कुटुंब वाचविण्या’चे अभियान, भाजपाचे काँग्रेसवर टीकास्त्र

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ अभियानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे हे अभियान केवळ एक दिखावा असून प्रामुख्याने ‘कुटुंबाला वाचविण्या’चे हे अभियान आहे. जेणेकरून देशातील सर्वात जुन्या पक्षावरील नियंत्रण आपल्या हाती राहील, असे भाजपाने म्हटले आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो’ यात्रेला कालपासून सुरुवात झाली. 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. एकूण 150 दिवस आणि 3500 किलोमीटर ही यात्रा चालेल. ही यात्रा आधीपासूनच भाजपाच्या निशाण्यावर राहिली आहे, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ही वास्तवात ‘गांधी परिवार बचाओ’ अभियान असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली होती.

तर, राहुल गांधी ‘भारत जोड़ो’ नव्हे तर, ‘भारत छोडो’ यात्रेसाठी प्रसिद्ध आहेत. राहुल गांधी जेव्हा देशभ्रमंती करतील तेव्हा भारत कसा आत्मनिर्भर झाला आहे, हे पाहून त्यांना आनंद होईल, अशी टीका तामिळनाडू भाजपाप्रमुख के. अन्नामलाई यांनी केली आहे. त्यापाठोपाठ भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. या यात्रेच्या माध्यमातून माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा नेतेपदी बसविण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

अलीकडेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले गुलाम नवी आझाद यांच्यासह अन्य नेत्यांचा उल्लेख करत, जी व्यक्ती आपल्या पक्षाला आणि नेत्यांना जोडू शकली नाही, ते देश काय जोडणार, असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला. तसेच जी वारंवार परदेशात जाते आणि जिला अध्यक्ष बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये ‘दरबारी गायन’ केले जाते, तीच व्यक्ती यात्रेवर निघाली आहे. ही कुटुंबाला वाचविण्याची यात्रा आहे, जेणेकरून पक्षावरील नियंत्रण कुटुंबाकडेच राहील. देश जोडण्याची गोष्ट म्हणजे केवळ दिखावा आहे, अशी टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे.

पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, कोरोना काळात लागू करण्याते आलेले लॉकडाऊन आणि सरकारच्या इतर कार्यक्रमांवर केवळ टीका केली, असे सांगत रवीशंकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी या आधी केवळ देश कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि आता देश जोडण्यासाठी यात्रेवर निगाले आहेत.