दिल्ली : कमबॅक अशी करायची की विरोधकांनी सुद्धा तोंडात बोटे घातली पाहिजे. असाच काहीसा प्रकार दिल्लीत घडला आहे. ज्या आमदाराला तत्कालीन विधानसभेच्या अध्यक्षांनी उचलून बाहेर काढले होते. तेच आता विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. तसेच, ज्यांनी विधीमंडळाच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले होते, ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
दिल्लीत 27 वर्षांनी भाजपची सत्ता आली आहे. ‘आप’कडून भाजपने सत्ता खेचून आणली आहे. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर, विजेंद्र गुप्ता हे विधानसभेचे अध्यक्ष होणर आहेत. याच विजेंद्र गुप्तांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
2015 आणि 2020 मध्ये आपचे वादळ दिल्लीत होते. त्या वादळातही विजेंद्र गुप्ता निवडून आले होते. यंदाही गुप्ता हे रोहिणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2015 असे झाले होते की, भाजपचे अवघे तीनच आमदार निवडून आले होते. त्यात गुप्ता हे एक होते. गुप्ता यांनी 2015 ते 2020 दरम्यान विरोधी पक्षाची भूमिका जोरदारपणे पार पाडली होती.
2015 च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात गुप्ता यांना अध्यक्षांनी विधीमंडळातून जबदरस्तीने बाहेर काढले होते. आता 10 वर्षांनी तेच गुप्ता दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत.
नेमके घडलेले काय?
30 नोव्हेंबर 2015 ला दिल्ली विधानसभेत भाजपचे आमदार ओपी शर्मा यांनी माजी आमदार अलका लांबा यांच्याविरोधात एक विधान केले होते. त्यावरून आप आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार वाद झाला होता. तेव्हा, तत्कालीन अध्यक्ष राम निवास गोयल यांनी विजेंद्र गुप्ता यांना 4 वाजेपर्यंत विधीमंडळाच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले होते. गुप्ता यांनी अध्यक्षांचे आदेश धुडकावून लावले. त्यानंतर विधीमंडळात मार्शल्सला बोलावण्यात आले. तेव्हा, मार्शल्सनी गुप्ता यांना जबरदस्तीने खांद्यावर घेऊन बाहेर काढले होते.
आता गुप्ता अध्यक्ष झाले आहेत. पण, माजी अध्यक्ष राम निवास गोयल आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने हे दोन्ही नेते सभागृहात नसणार आहेत.