पणजी : गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने नीलकमल बोट उलटून 15 पर्यटकांचा मृत्यू झाला. या अपघाताची आठवण अजून ताजी असतानाच गोव्यात देखील अशीच एक दुर्घटना नाताळच्या दिवशी घडली आहे. (boat carrying passengers capsized on goa calangute beach one dead 20 people rescued)
गोव्यातील कलंगुट समुद्राच्या किनारी पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर बोटीतील अन्य 20 जणांना वाचवण्यात यश आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना बुधवारी दुपारी दीडच्या आसपास घडली. समुद्र किनाऱ्यापासून 60 मी. अंतरावर ही बोट उलटली, यामुळे सगळे प्रवासी समुद्रात पडले.
या दुर्घटनेबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या बोटीतून पर्यटक प्रवास करत होते, ती उलटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 20 जणांना वाचवण्यात यश आले. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन पर्यटक सोडले तर बाकी सगळ्यांनी जीवनरक्षक जॅकेट घातले होते. या पर्यटकांमध्ये सहा वर्षाचा मुलगा आणि महिलांचा समावेश आहे.
सरकारने नियुक्त केलेली जीवनरक्षक एजन्सी दृष्टी मरीनच्या प्रवक्त्याने सांगितले की, समुद्र किनाऱ्यापासून 60 मी. अंतरावर ही बोट उलटली. यामुळे सगळे पर्यटक समुद्रात बुडाले. या बोटीत महाराष्ट्रातील खेड येथील 13 सदस्यीय परिवाराचा समावेश होता.
दृष्टी मरीनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. जे गंभीररित्या जखमी झाले त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींमध्ये सहा आणि सात वर्षांची दोन मुले, दोन महिलांचा समावेश आहे.
गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटा बेटाला जाणारी नीलकमल ही खासगी प्रवासी बोट बुधवारी दुपारी उलटली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 15 झाला आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये नौदलाचे चार कर्मचारी आहेत.
हेही वाचा – Kazakhstan : रशियाला जाणाऱ्या विमानाचा अपघात; 40 हून अधिक जणांचा मृत्यू
Edited by : Ashwini A. Bhatavdekar