Punjab assembly elections 2022: अभिनेता सोनू सूदच्या बहिणीचा काँग्रेस प्रवेश, कोणत्या जागेवरून लढणार निवडणूक?

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूदने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मालविका सूद यांच्या घरी जाऊन आज(सोमवार) काँग्रेसचे सदस्यत्व दिले. यावेळी सोनू सूदही उपस्थित होता.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचा शंखनाद वाजला आहे. पंजाबमध्ये आगामी महिन्याच्या १४ फेब्रुवारीपासून निवडणुकांना सुरूवात होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

कोणत्या जागेवरून लढणार निवडणूक?

सोनू सूदची बहीण मालविका सूद पंजाबमधील मोगामधून निवडणूक लढवणार आहे. सर्व पक्षांकडून ऑफर येत आहेत, परंतु एका आठवड्यात आम्ही पक्षाची निवड करू, असं सोनू सूद पक्षप्रवेश करण्याआधी म्हणाला होता. मागील वेळी काँग्रेसच्या हरजोत कमल यांनी निवडणूक जिंकली होती. त्यामुळे मालविका यांचे तिकिट रद्द करण्यात आले होते.

कोण आहे मालविका सूद?

मालविका सूद ही बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची सर्वात लहान बहीण आहे. तिचं वयवर्ष ३८ आहे. त्यांची मोठी बहीण मोनिका शर्मा अमेरिकेत राहते. मालविका यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून मोगा येथे इंग्रजी कोचिंग सेंटर चालवतात. त्याचसोबतच त्यांनी शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे.

दरम्यान, मालविका ही एक सुशिक्षित महिला असून अशा लोकांची गरज असल्याचं सिद्धूंनी सांगितलं आहे. यापूर्वी सिद्धूंनी मोगा येथे सोनू सूदच्या घरी पोहोचल्यानंतर अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या बहिणीचीही भेट घेतली होती. परंतु मालविका यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हे निवडणुकीपूर्वी गेम चेंजर असल्याचे वर्णन केलं जात आहे.


हेही वाचा : IPL 2022 : BCCIकडून अहमदाबाद टीमला मंजूरी, कोण होणार टीमचा कर्णधार?